शिंदे गटाचे नेते आणि हिंगोलीचे आमदार संतोष बांगर हे वेगवेगळ्या कारणांमुळे नेहमीच चर्चेत असतात. काही दिवसांपूर्वी त्यांचा विज वितरण अधिकाऱ्याला शिवीगाळ करतानाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. या व्हायरल क्लिपवरुन चांगलेच राजकारण तापले होते. आता पुन्हा एकदा आमदार बांगर यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये संतोष बांगर अश्लिल शिविगाळ करताना दिसत आहेत. ही ऑडिओ क्लिप उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या नेत्या अयोध्या पोळ पाटील यांनी ट्विटरवर शेअर करत संताप व्यक्त केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील चिखली गावच्या तरुणाला शिंदे गटाचे आमदार सतोष बांगर हे अश्लील भाषेत शिवीगाळ करत असल्याचा एक ऑडियो सध्या व्हायरल होत आहे. समोर आलेल्या माहितीनुसार या तरुणाने आमदार बांगर यांना फोन करून फायनान्स कंपनीवाले आपल्याला त्रास देत असल्याची तक्रार केली. मात्र आमदार बांगर यांनी या तरुणाला बोलताना आमदार बांगर हे मयत झाले आहेत त्यांना फोन करू नका असे सांगितले, ज्यामुळे त्यांच्यातील वादाला सुरूवात झाली.
त्यानंतर या तरुणाचा देखील पारा चढला आणि या तरुणाने आमदार संतोष बांगर यांना शिव्या देण्यास सुरुवात केली. त्यानंतर आमदार बांगर हे देखील संतापले आणि त्यांनी या तरुणाला अश्लील भाषेत शिवीगाळ केली. धक्कादायक म्हणजे राष्ट्रीय साखर महासंघाचे अध्यक्ष व महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर, अजित पवार यांच्या नावाचाही उल्लेख करत आमदार बांगर यांनी या तरुणाला शिवीगाळ केल्याचे ऑडिओ क्लिप मध्ये दिसत आहे.
दरम्यान ही ऑडिओ क्लिप उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या नेत्या अयोध्या पोळ पाटील यांनी ट्विटरवर पोस्ट करत आमदार बांगर यांच्यावर टीका केली आहे. “शी असला गधळ, गच्च्याळ, संस्कारहीन अन जातीवरुन शिवीगाळ करणारा संविधानीक पदावर बसलेला लोकप्रतिनिधी आहे आणि आपले मुख्यमंत्री अन उपमुख्यमंत्री यांची पाठ थोपटतात म्हणे? मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यावर काही करवाई करणार का? की कौतुकाने पाठ थोपटणार,” असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. मात्र ही क्लिप आमदार बांगर यांचीच आहे का व क्लिप मधील आवाज त्यांचाच आहे का याबाबत अद्याप पुष्टी नाही, सध्या ही क्लिप राज्यभर सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.