नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पुढच्या 5 वर्षांसाठी मोठी घोषणा केली आहे. पुढच्या 5 वर्षांमध्ये पेट्रोल-डिझेलवरची निर्भरता पूर्णपणे संपवायची आहे, असं नितीन गडकरी म्हणाले आहेत.
नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर इलेक्ट्रिक गाड्या किंवा फ्लॅक्स फ्युएलवर चालणाऱ्या गाड्या विकत घेतल्या पाहिजेत, असंही नितीन गडकरी म्हणाले आहेत. लोकांनी एलएनजी, सीएनजी, बायोडिझेल, हायड्रोजन, इलेक्ट्रिक आणि इथेनॉलवर चालणाऱ्या वाहनांचा वापर करावा, असा माझं उद्दीष्ट असल्याचं गडकरी एका कार्यक्रमात म्हणाले. आपण पुढच्या 5 वर्षात देशातली पेट्रोल-डिझेलची गरज संपवण्यासाठी काम करत आहोत, लोकांच्या समर्थनाशिवाय हे शक्य नाही, अशी प्रतिक्रिया नितीन गडकरी यांनी दिली आहे. ई-वेहिकल्ससाठी वेटिंग लिस्ट काही काळापूर्वी लोक इलेक्ट्रिक वेहिकल्सच्या चार्जिंग आणि आव्हानाबाबत बोलत होते, पण आता वेळ बदलली आहे.
इलेक्ट्रिक वेहिकल्सचा बाजार खुला झाला आहे. आता लोकांना ई-वेहिकल्स विकत घेण्यासाठी वेटिंग लिस्टमध्ये राहावं लागतंय. आता तुम्हाला वाहन विकत घ्यायचं असेल तर पेट्रोल-डिझेलऐवजी इलेक्ट्रिक किंवा फ्लेक्स इंजिन असलेलं वाहन घ्या, असं आवाहन गडकरींनी केलं आहे. शेतकरी फक्त अन्नदाता नाही शेतकरी आता फक्त अन्नदाता नाही तर उर्जादाताही आहे.
फ्लेक्स इंजिन कारमध्ये शेतकऱ्यांनी बनवलेल्या इथेनॉलचा प्रयोग होऊ शकतो, असं नितीन गडकरी म्हणाले, तसंच नागरिकांनी पार्किंगसाठी रस्त्यांचा उपयोग करू नये, असं आवाहनही त्यांनी केलं. ‘दिल्लीला पॉल्युशन फ्री करणं माझं लक्ष्य आहे. मी जेव्हा जल संसाधन मंत्री होतो तेव्हा जल प्रदुषणाचा सामना करण्यासाठी दिल्ली सरकारला 6 हजार कोटी रुपये दिले होते. आता वायू आणि ध्वनी प्रदुषणाचा सामना करायचा आहे. माझं पहिलं टार्गेट दिल्लीमध्ये तीनही प्रकारचं प्रदूषण संपवणं आहे,’ असं वक्तव्य गडकरींनी केलं.