उपमुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना 1 कोटी रुपयांची लाच देण्याचा प्रयत्न झाला आहे. काल (गुरुवारी) विधानसभेतही या प्रकरणाचे पडसाद उमटलेले. राष्ट्रवादीचे नेते, विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी यावरुन प्रश्न उपस्थित केल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी संपूर्ण घटनाक्रम सांगितला. यावर आज ‘सामना’तून देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.
“भ्रष्ट मार्गाने सत्तेवर आलेल्या सरकारने तत्त्व आणि नीतिमत्तेच्या फालतू वल्गना करू नयेत हेच बरे. अन्यथा तुमचेच वस्त्रहरण होईल. अमृता फडणवीस या शुद्ध आणि पवित्र आहेत. त्यांचे बोलणे हा त्यांच्या व्यक्तिगत स्वातंत्र्याचा विषय आहे, पण 1 कोटी रुपयांची लाच देण्याचा प्रयत्न करणारे तुमच्या स्वयंपाक घरापर्यंत पोहोचले कसे? असा सवाल ‘सामना’तून फडणवीसांना विचारण्यात आला आहे.
कायद्याचे राज्य साफ कोसळले आहे. ते असेच कोसळत राहिले तर महाराष्ट्र कोसळेल व महाराष्ट्राच्या प्रतिमेस तडेच तडे जातील. त्यास सुरुवात झाली आहे. या राज्यात सर्वकाही पैशानेच साध्य होते व ‘लाच’ हाच परवलीचा शब्द झाला आहे. ‘लाच’ देणे व घेणे यात गैर वाटत नाही अशी महाराष्ट्राची प्रतिमा झाली आहे. व त्यामुळेच हे राज्य भविष्यात संतसज्जनांचे राहील काय, असा प्रश्न पडतो. गौतम अदानी यांच्या भ्रष्टाचारावर दरोडेखोरीवर महाराष्ट्राचे सरकार गप्प आहे, असे अग्रलेखात म्हटलं आहे.
सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे
फडणवीस हे नाकाने कांदे सोलत सांगतील की, कर नाही त्याला डर कशाला?’ फडणवीस तुमचे बरोबर आहे, पण ‘डर’ आम्हाला नसून तुमच्या लोकांना आहे व तुमच्याच संरक्षणाखाली भ्रष्टाचाराचे कुरण फुलले आहे.
दौंडच्या भीमा पाटस साखर कारखान्याचा 500 कोटींचा घोटाळा समोर आला. शेतकऱ्यांचा पैसा भाजप आमदार कुल यांनी ‘हडप’ केला.
तुमच्या नाकासमोर भ्रष्टाचार घडला व तुम्ही आरोपींना वाचवत आहात. हेच काय तुमचे कायद्याचे राज्य? कर नाही त्याला डर कशाला? हे कुल यांच्यासारख्यांना सांगितलेत तर बरे होईल.
भ्रष्टाचान्यांना संरक्षण देण्याचेच तुमचे धोरण आहे. मुंबईतील ‘मुका प्रकरणातील मुख्य आरोपी राहिले बाजूला, उलट राजकीय विरोधकांवरच कारवाई केली जात आहे.