नवी दिल्लीः शिवसेना ठाकरे गट आणि शिंदे गटातील सत्तासंघर्षावर आजा सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडणार आहे. ठाकरे गटाचा युक्तिवाद झाल्यानंतर आता शिंदे गटाचा युक्तिवाद पूर्ण होणार आहे. मागील सुनावणीत ठाकरे गटाचा युक्तिवाद झाल्यानंतर शिंदे गटाच्या युक्तिवादाला सुरुवात झाली होती. मात्र शिंदेंच्या वकिलांकडून आणखी वेळ मागितल्याने आज त्यांचा युक्तिवाद पार पडणार आहे.
शिंदे गटाची बाजू लढवणारे ज्येष्ठ वकील निरज किशन कौल आणि ज्येष्ठ वकील हरीश साळवे हे आज आपला युक्तिवाद मांडतील. तसेच तत्कालीन राज्यपालांची बाजू सॉलिटर जनरल तुषार मेहता मांडणार आहेत. शिंदे गटाचा युक्तिवाद आज पूर्ण होणं अपेक्षित आहे. यासह आजच स्थानिक निवडणुकांच्या सुनावणीचीही तारीख आहे. याची तारीख लांबणीवर जाण्यीच शक्यता वर्तवण्यात येत आहे. सत्तासंघर्षावर आज सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास सुरूवात होईल.
सत्तासंघर्ष प्रकरणावरील सुनावणी प्रक्रिया २ मार्चपर्यंतच न्यायालयाला पूर्णपणे पार पाडायची अपेक्षा होती. यासाठी न्यायालयाने वेळापत्रक देखील आखले होते. मात्र शिंदे गटाचे वकील हरिश साळवे यांचा युक्तिवाद या निश्चित वेळापत्रकानुसार पूर्ण होऊ शकला नाही. यामुळे त्यांनी वेळा वाढवून मागितली होती.
आता यावर प्रकरणी सुनावणीची प्रक्रिया लवकर आणि वेळेत पार पडावी यासाठी सरन्यायाधीशांनी सर्व वकीलांना वेळा ठरवून दिल्या. यानुसार आता आज सुनावणी सुरू होऊन, सकाळच्या सत्रात शिंदे गटाच्या वकीलांनी युक्तिवाद पूर्णपणे पार पाडावा,असे सांगितले आहे. आज शिंदे गटाचा युक्तिवाद पुर्ण होणे अपेक्षित आहे. सुनावणीनंतर न्यायालय निर्णय देण्याच्या टप्प्यावर येईल. आज सकाळी ११ वाजता सुनावणीला सुरूवात होईल.