मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ माजवून देणारे आरोप आज संजय राऊत यांनी केले आहेत. विरोधी पक्षातील नेत्यांवरील भ्रष्टाचाराच्या आरोपांविरोधात ईडी, सीबीआय तपास यंत्रणांची कारवाई भाजपकडून सुरु असते. मात्र भाजपच्याच नेत्यांची भ्रष्टाचाराची प्रकरणं दाबली जातात, असा आरोप महाविकास आघाडीकडून सातत्याने करण्यात येतो. याच मालिकेत संजय राऊत यांनी आज पुणे जिल्ह्यातील दौंडचे आमदार राहुल कुल यांच्यावर भ्रष्टाचाराचे मोठे आरोप केले आहेत. यासंदर्भात त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भलं मोठं पत्रही लिहिलं आहे. तर विरोधी पक्षांच्या नेत्यांची भ्रष्टाचाराची प्रकरणं उघडकीस आणणाऱ्या किरीट सोमय्या यांच्यावरही निशाणा साधला आहे. या प्रकरणात सोमय्या मूग गिळून का बसलेत, असा सवाल राऊत यांनी केला आहे. संजय राऊत यांचं हे पत्र आज राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे. पण यासोबतच राहुल कुल यांच्याविरोधातच संजय राऊत यांनी नवी मोहीम का उघडली, यामागील कारणांचीही जोरदार चर्चा सुरु आहे.
हक्कभंगाशी काय कनेक्शन?
संजय राऊत यांनी आमदार राहुल कुल यांच्याविरोधातच हे भ्रष्टाचाराचे आरोप केलेत, यामागे एक मोठं कारण पुढे आलं आहे. संजय राऊत यांनी विधिमंडळाविषयी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यावरून त्यांच्याविरोधात हक्कभंगाची नोटीस जारी करण्यात आली आहे. राऊत यांना ‘विधिमंडळ हे चोरमंडळ आहे’ या वक्तव्यावरून लेखी खुलासा मागण्यात आला आहे. त्यांनी खुलासा केल्यानंतर राऊत यांच्यावर हक्कभंगासंबंधी काय कारवाई करायची, यासाठी हक्कभंग समिती नेमण्यात आली आहे. विधिमंडळातील या हक्कभंग समितीचे अध्यक्ष आमदार राहुल कुल आहेत. संजय राऊत यांनी या कनेक्शनमधूनच राहुल कुल यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केलेत का, यावरून राजकारणात चर्चा सुरु आहे.
कोण आहेत राहुल कुल?
एकनाथ शिंदे आणि भाजपचं सरकार आल्यानंतर सप्टेंबर महिन्यात राहुल कुल हे एका व्हिडिओतून चर्चेत आले होते. जेजुरीच्या दर्शनाला गेल्यानंतर त्यांनी पत्नीला उचलून पाच पायऱ्या चढल्या होत्या. हा व्हिडिओ तुफान व्हायरल झाला होता. राहुल कुल हे पुण्यातल्या दौंड विधानसभा मतदार संघाचे भाजपचे आमदार आहेत. यापूर्वी ते राष्ट्रीय समाज पक्षाचे आमदार होते. 2019 मध्ये त्यांनी भाजपात प्रवेश केला आणि त्यावेळच्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या तिकिटावर विजय मिळवला. राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल यादेखील प्रभावी नेत्या आहेत.भाजपचे आमदार राहुल कुल यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या कांचन कुल यांच्या आत्या आहेत. मात्र भाजपने शरद पवारांविरोधात कांचन कुल यांच्यामार्फत तगडं आव्हान उभं केलंय. गेल्या वेळी बारामती मतदार संघातून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांना तगडी फाइट दिली होती. सुप्रिया सुळेंना 6, 86, 714 मतं मिळाली होती. तर कांचन कुल यांनी 5 लाख 30 हजार 940मतं मिळवली होती.
राजकीय वारसा
आमदार राहुल कुल यांचे वडील सुभाष हे 1990 मध्ये अपक्ष म्हणून निवडून आले होते. त्यानंतर शरद पवार आणि कुल कुटुंबाची जवळीक वाढली. 1999 मध्ये कुल यांनी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आमदारकी मिळली. सुभाष कुल यांच्या आकस्मिक निधनानंतर त्यांच्या पत्नी रंजना कुल यांना उमेदवारी देण्यात आली. 2009 मध्ये राहुल कुल यांनाच पक्षाने संधी दिली. निवडणुकीत बंडखोर उमेदवाराला राष्ट्रवादीने पाठिंबा दिल्याचा आरोप करत कुल यांनी राष्ट्रीय समाजवादी पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवली आणि आमदारकी खेचून आणली. तेव्हापासून ते शरद पवार यांचे कट्टर विरोधक मानले जातात. 2019 मध्ये कुल यांनी रासप सोडून भाजपात प्रवेश केला.