मुंबई : एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताना राज्यात यापुढे एकही शेतकऱ्यांची आत्महत्या होऊ देणार नाही. आत्महत्यामुक्त महाराष्ट्र होईल असा विश्वास जनतेला दिला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या याच मुद्द्यावरून विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधानसभेत मुद्दा उपस्थित केला. यावेळी त्यांनी राज्यात दररोज किती शेतकरी आत्महत्या करत आहेत याची आकडेवारीच जाहीर केली. मात्र, त्याआधी अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकार शेतकऱ्यांविषयी अत्यंत असंवेदनशील असल्याचा घणाघाती हल्ला चढविला.

शेतकरी हाच जगाचा पोशिंदा आहे. तोच अडचणीत असेल तर राज्याचे आणि देशाचे अर्थचक्र फिरु शकत नाही. कल्याणकारी राज्याची संकल्पना राबवत असताना सरकारने कृषी क्षेत्राला प्राधान्य देण्याची आवश्यकता आहे. मात्र, शिंदे-फडणवीस सरकार कृषी खात्यातल्या बदल्या, पदोन्नती आणि भरतीमध्ये अडकले आहे असा आरोप अजित पवार यांनी केला.

अधिक वाचा  पुन्हा अंतिम फेरीत खेळणार श्रेयस अय्यर, यावेळी ट्रॉफी निश्चित !

आता हॉस्पिटलचं बील वाढलं तरी नो टेन्शन, राज्य सरकारची मोठी घोषणा, सर्वसामांन्यांना दिलासा

कृषी पंपाची वीज जोडणी तोडू नये, असे आदेश दिल्याचे सरकार म्हणते पण, फिल्डवर वेगळीच स्थिती आहे. शेतकऱ्यांच्या वीजेची कनेक्शन तोडली जात आहेत. कृषी धोरणानुसार वीज थकबाकीसंदर्भात धोरणात्मक निर्णय घेऊन ती माफ करायला हवी अशी मागणी विरोधी पक्षात असताना देवेंद्र फडणवीस करत होते. मग आता ते मागे का सरकत आहेत, असा सवाल त्यांनी केला.

राज्यात राष्ट्रीयकृत बँका शेतकऱ्यांना कर्ज देत नाहीत. शेतकऱ्यांचे ‘सिबील’ स्कोअर बिघडल्यामुळे त्यांना कर्ज मिळण्यास अडचणी येत आहेत. शेतकऱ्यांना अडचणीच्या काळात बँकांनी कर्ज दिले नाही तर मग त्यांना नाईलाजाने सावकारांच्या दाराशी उभे रहावे लागते. ती कर्जफेड त्यांच्याकडून होत नाही आणि मग आत्महत्येपर्यंत शेतकरी पोहोचतो. हे मोठे दुष्टचक्र आहे. ते भेदण्यात सरकार अपयशी ठरत आहे असे ते म्हणाले.

अधिक वाचा  पुन्हा पुढे ढकलण्यात आले अ‍ॅक्सिओम मिशन-४, आज संध्याकाळी उड्डाण करणार होते शुभांशू शुक्ला

रोज आठ शेतकऱ्यांच्या आत्महत्या
नापिकी, अतिवृष्टी, अवकाळी पाऊस या नैसर्गिक संकटाने राज्यातली शेती अडचणीत आली आहे. शेतमालाला मातीमोल दर मिळत आहे. भाजीपाला, शेतमाल रस्त्यावर फेकण्याची वेळ राज्यातल्या बळीराजावर आली. खतांच्या वाढलेल्या किंमती, बोगस बियाण्यांचा प्रश्न, घसरलेल्या ‘सीबील’मुळे बँका कर्ज देत नाहीत, कृषीपंपाच्या वीज कनेक्शन तोडली जात आहे त्यामुळे राज्यातला शेतकरी मेटाकुटीला आला आहे. राज्यातला शेतकरी खचला आहे. त्यामुळे राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्येत वाढ झाली असून रोज आठ शेतकरी आत्महत्या करत आहेत असा गौप्यस्फोट अजित पवार यांनी केला.

हाच का आत्महत्यामुक्त महाराष्ट्र ?
२०१४ ते २०१९ या देवेंद्र फडणवीस सरकारच्या पाच वर्षाच्या काळात ५०६१ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. उद्धव ठाकरे सरकारच्या अडीच वर्षाच्या काळात १ हजार ६६० तर एकनाथ शिंदे यांच्या केवळ जुलै २०२२ ते जानेवारी २०२३ या सात महिन्यांच्या काळात १०२३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. एकनाथ शिंदे यांनी राज्यात यापुढे एकही शेतकऱ्यांची आत्महत्या होऊ देणार नाही. आत्महत्यामुक्त महाराष्ट्र होईल असे सांगितले होते. पण, केवळ सात महिन्यात हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या हाच का तुमचा आत्महत्यामुक्त महाराष्ट्र अशी टीकाही त्यांनी सरकारवर केली

अधिक वाचा  पुणे व पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपची स्वबळावर लढण्याची तयारी; स्थानिक नेतृत्व आपल्या निर्णयावर ठाम