राज्याचा अर्थसंकल्प आज पार पडला आहे. या अर्थसंकल्पात मोठ मोठ्या घोषणांचा पाऊस पडला मात्र या अर्थसंकल्पावर विरोध पक्षातील नेत्यांनी तिव्र नाराजी व्यक्त केली आहे. विरोधी पक्ष नेते अजित पवारांनी हा अर्थसंकल्प चुनावी जुमला आहे, अशी प्रतिक्रिया दिली. तर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हा अर्थसंकल्प गाजराचा हलवा असल्याचे म्हटले आहे. एकीकडे अर्थसंकल्प अधिवेशन चालू आहे. तर दुसरीकडे मविआ शिंदे आणि फडणवीस सरकारला चितपट करण्याची योजना आखत आहे. आज अर्थसंकल्प संपल्यानंतर महाविकास आघाडीच्या महत्त्वाच्या नेत्यांची एक बैठक पार पडली आहे.
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या ‘अजिंक्यतारा’ या शासकीय निवासस्थानी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील, खासदार संजय राऊत यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली याबाबतची माहिती स्वत: राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली आहे.
“महाराष्ट्रामध्ये भविष्यकाळात तिन्ही पक्ष मिळून एकत्रितपणे सभा घेण्याचं नियोजन करत आहे. त्यासाठी १५ तारखेला पुन्हा एकदा बैठक बोलवली आहे. पुढील काळात महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात सभा घेण्याचे ठरवले आहे. 2 एप्रिलला महाविकास आघाडीच्या संयुक्त सभेची सुरवात छत्रपती संभाजीनगर येथून होईल. या सभेची जबाबदारी अंबादास दानवे, राष्ट्रवादीचे सतीश चव्हाण यांच्यावर देण्यात आली आहे. ही संयुक्त सभा मराठवाडा सांस्कृतिक क्रीडा मंडळ येथे पार पडणार आहे. अशी महत्त्वाची माहिती जयंत पाटील बैठकीनंतर दिली. त्यामुळे येत्या काळात भाजप आणि शिवसेनेला मोठा दणका सहन करावा लागू शकतो.