बॉलिवूडमध्ये नाती जशी जुळायला वेळ लागत नाही त्याचबरोबर नाती बिघडायलाही फारसा वेळ लागत नाही. आपले-परके सगळेच या बॉलिवूडच्या मायाजाळात गुण्यागोविंदानं नांदताना दिसतात खरे, परंतु त्यांची कधी वाट चुकेल आणि कधी ते एकमेकांचे वैरी होतील याचाही काहीच थांगपत्ता लागत नाही.
सध्या बॉलिवूडमध्ये काहीसा असाच प्रकार पाहायला मिळतो आहे. अभिनेता गोविंदा आपल्या हटके स्टाईलसाठी, नृत्यासाठी आणि अभियासाठी ओळखला जातो. गेल्या अनेक वर्षांपासून तो चित्रपटसृष्टीपासून लांब आहे. परंतु काही दिवसांपासून तो आपल्या वैयक्तिक आयुष्यातील चढाओढीमुळे चर्चेत आहे. नक्की असं काय झालंय की गोविंदाची मोठ्या प्रमाणात चर्चा होते आहे? याला कारण आहे त्याच्यातील आणि कृष्णा अभिषेकमधील भांडणं.
कृष्णा अभिषेकची ओळख आपल्यापैंकी कोणाला नवीन नाही. कपिल शर्माच्या शोमध्ये कृष्णा अभिषेक झळकला होता आणि तेव्हापासून तो लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. परंतु मध्यंतरी कपिल शर्मा यांच्या शोमधील वाद, त्यातून कलाकार सोडून जाणं आणि यामुळे कृष्णा अभिषेकचीही बरीच चर्चा रंगली होती. तोही शो सोडणार याकडेही अनेकांचे लक्ष लागले होते.
कलाकार हे आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल फारसे बोलताना दिसत नाहीत. त्यामुळे त्यांच्याबद्दल जाणून घेण्यासाठी त्यांच्या नातेवाईकांना नाहीतर मित्रमंडळींना प्रश्न विचारून त्यांच्याकडून काहीतरी बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जातो. सध्या कृष्णा अभिषेकवरून गोविंदाच्या कुटुंबात मात्र वादळ उठलं आहे. कृष्णा अभिषेक हा गोविंदाच्या सख्ख्या बहिणीचा मुलगा आहे. जेव्हा कृष्णा आपल्या करिअरसाठी धडपड करत होता तेव्हा त्याला गोविंदा यांनी मदत केली असल्याचे सांगितले होते. त्या काळी गोविंदा आपल्याला 2000 रूपये देत असतं अशी बातमी कृष्णा अभिषेक यांनं दिली होती.
गोविंदाच्या पत्नीचे याआरोप कोणते?
यावेळी गोविंदाच्या पत्नीचे सुनिताचे कृष्णा अभिषेकवर गंभीर आरोप असल्याचे समोर आले आहे. कृष्णा अभिषेकच्या याच प्रश्नावर गोविंदा आणि पत्नी सुनिता यांना एक प्रश्न विचारण्यात आला होता. त्या मुलाखतीदरम्यान मात्र सुनिता यांनी कृष्णा अभिषेक जे काही बोलत आहे ते चुकीचे असल्याचे म्हटले आहे. त्या सुरूवातीला म्हणाल्या की, ”त्याच्याबद्दल मला काही सांगू नका आणि विचारूनही नका, गोविंदा त्याला फक्त 2000 रूपये द्यायचा ही बातमी तर अत्यंत खोटी आहे. गोविंदा यांनी असं कधी केलेलं नाही त्यातून आता आम्हाला त्याच्याबद्दल काळजी घेतल्याचीही लाज वाटते आहे.”
गोविंदा यावर काय म्हणाले?
आपण कधी मीडियासमोर आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल फारसे बोलत नाही त्यामुळे आमचा तसाही काही संबंध नाही. काही लोकांना असे वाटते की आपली लोग काळजी घेतायत म्हणजे त्यांच्याबद्दल इतरांना सांगून आपण फार मोठेपणा दाखवत आहोत परंतु असे नसते. जर तो माझ्याबद्दल चांगलं बोलत असेल तर चांगलंच आहे. परंतु एक ना एक दिवस खरं काय ते समोर येईलच.