केंद्र सरकारने गेल्या महिन्यात औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर अशा नामांतराला अधिकृतपणे मान्यता दिली. पण केंद्र सरकारच्या या निर्णयावरुन आत औरंगाबादचं राजकारण चांगलंच तापलं आहे. काही दिवसांपासून या नामांतराविरोधात एमआयएमचे साखळी आंदोलन सुरू आहे. खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू असतानाच आता या नामांतराला राष्ट्रवादीचाही विरोध असल्याचे दिसत आहे. या नामांतराला विरोध करत छत्रपती संभाजीनंगरमधील राष्ट्रवादीच्या ५० पदाधिकाऱ्यांनी सामुहिक राजीनामे दिले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मंत्र्यांनी छत्रपती संभाजीनगर शहराच्या नामांतराला सहमती दिली आणि तेव्हापासून शहराचे नामांतर करण्यासाठी वारंवार प्रयत्न करण्यात आले, असा आमचा विश्वास आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा धर्मनिरपेक्ष आणि सर्वांना सोबत घेऊन चालणारा पक्ष आहे, अशी आमची भावना होती. यासाठीच आम्ही आजपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात काम करत होतो. परंतु नामांतराला समर्थन दिल्यामुळे आता आमची ही भावना संपली आहे. पक्ष आमच्यावर न्याय करू शकत नाही, असं या पदाधिकाऱ्यांनी म्हणणं आहे. दरम्यान, एकीकडे एमआयएमचा या नामांतराला विरोध होत असतानाच राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिल्याने नामांतराविषयी राष्ट्रवादीची दुटप्पी भूमिका घेत असल्याची चर्चा रंगू लागली आहे. त्यामुळे हा विषय आता राष्ट्रवादीसाठी मोठी डोकेदुखी ठरताना दिसत आहे.

अधिक वाचा  ‘बेहरामपाड्यात जाऊन तिथे…’, उद्धव-राज ठाकरे संभाव्य युतीवर राणेंची जळजळीत प्रतिक्रिया