गेल्या काही दिवसांपासून नवाजुद्दीन सिद्दीकीचं वैवाहिक आयुष्य चर्चेचा विषय ठरत आहे. नवाजुद्दीनची पूर्वाश्रमीची पत्नी आलिया सिद्दीकी सातत्याने त्याच्यावर गंभीर आरोप करत आहे. नवाजुद्दीनसह त्याच्या कुटुंबियांवरही आलियाने छळ केल्याचा आरोप केला. या सगळ्या प्रकरणामध्ये नवाजुद्दीनच्या मुलांनाही तिने सहभागी करुन घेतलं. आता त्याने या सगळ्या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. शिवाय घटस्फोटाबाबतही मोठा खुलासा केला आहे.
नवाजुद्दीने आलिया करत असलेल्या आरोपांवर मौन राखलं होतं. त्याने आलियाला उत्तर देणंच नापसंत केलं. आपली मुलं हा सगळा प्रकार बघतील म्हणून त्याने मौन राखलं असल्याचा खुलासा केला. पण आता त्याने आलियावर आरोप केले आहेत. त्याचबरोबरीने वैवाहिक आयुष्याबाबत पहिल्यांदाच खुलासा केला आहे.
नवाजुद्दीन व आलिया एकत्र राहत नसून त्यांचा घटस्फोट झाला आहे. नवाजुद्दीन म्हणाला, “मी तुम्हा सगळ्यांना काही गोष्टी सांगू इच्छितो. गेल्या काही वर्षांपासून मी व आलिया एकत्र राहत नाही. आमचा आधीच घटस्फोट झाला आहे. पण आम्ही मुलांसाठी समजुतदारीने वागलो”. नवाजुद्दीन व आलियाचा घटस्फोट झाला असल्याचं आता उघडकीस आलं आहे.
प्रत्येक महिन्याला नवाजुद्दीन आलियाला १० लाख रुपये देतो. याबाबत त्याने स्वतःच सांगितलं आहे. शिवाय आलियासह त्याच्या मुलांचा सगळा खर्च तो स्वतःच करतो. आलिया दोन्ही मुलांसह दुबईमध्ये राहते. नवाजुद्दीनची मुलं दुबईमध्येच शिक्षण घेतात. पण गेल्या काही दिवसांपासून नवाजुद्दीन व आलियामधील वाद विकोपाला गेला आहे.