पुणे: राज्यातील सत्ताधारी आणि विरोधकांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या पुण्यातील कसबा पेठ आणि चिंचवड या दोन विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचे निकाल गुरुवारी जाहीर झाले आहेत. ‘कसबा पेठ’ या भारतीय जनता पक्षाच्या पारंपरिक बालेकिल्ल्याला खिंडार पाडताना काँग्रेसच्या रवींद्र धंगेकर यांनी भाजपचे हेमंत रासने यांचा 10 हजार 915 मतांनी पराभव करून ‘कसब्यात कमळच’ या अतिआत्मविश्वासाच्या पाकळ्या पूर्णत: विखरून टाकल्या आहेत. यानंतर भाजपाचे पराभूत उमेदवार हेमंत रासने यांनी बैठक बोलवली होती. यात पराभवाचे खापर नगरसेवकांवर फोडताना कार्यकर्त्यांनी गंभीर आरोप केलेत.
काय म्हणाले कार्यकर्ते?
कसब्यातील भाजपाच्या पराभवावर आत्मचिंतन करण्यासाठी मतदारसंघातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक बोलवण्यात आली होती. या बैठकीला कसबा मतदार संघातील सगळे नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना बोलवलण्यात आलं आहे. यावेळी कार्यकर्त्यांनी भाजपच्या पराभवाचं खापर नगरसेवकांवर फोडलं. बैठकीला काही नगरसेवकांनी दांडी मारल्याने कार्यकर्ते नाराज झाले. कसब्यात कार्यकर्त्याला प्रचार सोडून नेत्यांच्याच मागे फिरावं लागत होतं. बाला शुक्ला या कार्यकर्त्याने व्यक्त केलं परखड मत. हा भाजपचा पराभव नाही तर आपली रणनीती चुकली असल्याचे ते म्हणाले. आपण मीडिया पब्लिसिटीत पुढे होतो. पण माऊथ पब्लिसिटीत कमी पडलो. बाला शुक्ला या कार्यकर्त्याची प्रांजळ कबुली. “इलेक्शन टुरिझम” हा शब्द मला पहिल्यांदाच बघायला मिळाला. या बैठकीला फक्त 3 आजी माजी नगरसेवक हजर होते.
नतृत्वात बदल होणार?
भारतीय जनता पक्षाच्या राज्यातील सर्व शहर, जिल्हा संघटनांमध्ये तातडीने बदल करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. या महिनाअखेरीस शहर भाजपमध्येही मोठ्या प्रमाणात बदल करण्याचे संकेत आहेत. कसबा पेठ पोटनिवडणुकीतील पराभवामुळे पुणे शहरातील बदलांना महत्त्व प्राप्त झाल्याचा गौप्यस्फोट भाजपमधील एका ज्येष्ठ नेत्याने केला आहे. केंद्रीय नेतृत्वाकडून महिनाअखेरीस राज्यातील भाजप संघटनेमध्ये बदल करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पुणे शहर संघटनेचेही मुदत संपल्याने बदल करण्यात येणार आहेत. कसबा पेठ पोटनिवडणुकीत झालेल्या पराभवाची कारणमीमांसा करणारा अहवाल राज्यातील नेतृत्वाने तयार करण्याच्या सूचना काही घटकांना दिल्या आहेत. हा अहवाल तयार करताना ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, विधान परिषदेतील भाजपचे गटनेते प्रवीण दरेकर, आमदार प्रसाद लाड आदींच्या प्रतिक्रियाही नोंदविण्यात येणार असल्याचे समजते.