भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रदेशाध्यक्षपदाला जवळपास सहा महिने उलटून गेले आहेत. पक्षाचे विदर्भातील मोठे बहुजन नेते म्हणून त्यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपद देण्यात आले. नव्या सरकारमध्ये चंद्रकांत पाटील यांच्याकडे मंत्रीपदाचा भार देण्यात आल्याने त्यांच्याजागी प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी बावनकुळे यांच्याकडे देण्यात आली. त्याआधी विधान परिषदेवर त्यांची वर्णी लावण्यात आली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारी नाकारलेल्या बावनकुळे यांचे अशाप्रकारे पूनर्वसन करण्यात आले.
नागपूर जिल्ह्यातील कामटी हा बावनकुळे यांना परंपरागत मतदारसंघ आहे. मात्र, २०१९ च्या निवडणुकीतून त्यांना दूर ठेवण्यात आले. पक्षातील वरिष्ठांनी त्यांना उमेदवारी नाकारल्याची चर्चा त्यावेळी होती. राज्यातील नेत्यांनी अनेक प्रयत्न केल्यानंतरदेखील बावनकुळे यांना उमेदवारी मिळाली नाही. त्याचा फटका अर्थातच विदर्भातील तब्बल आठ-दहा मतदारसंघात बसल्याचे त्यावेळी सांगण्यात येत होते. बावनकुळे यांना उमेदवारी दिली असती तर १०५ वर अडकलेला भाजपाच्या आमदारांचा आकडा त्यावेळी ११५ पर्यंत गेला असता, असेदेखील सांगणारी राजकीय मंडळी आहेत. अडीच वर्षे पूर्णपणे बाजूला ठेवल्यानंतर आधी विधान परिषदेवरील आमदारकी आणि नंतर थेट प्रदेशाध्यक्षपद देऊन बावनकुळे यांच्यावर विश्वास दाखविण्यात आला. प्रदेशाध्यक्षपद मिळाल्यानंतर बावनकुळे यांनी राज्याचा जोरदार दौरा केला. संघटनेत जीव ओतण्याचा आणि निवडणुकीसाठी तयार करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
मात्र, या काळात चिंचवड आणि कोकण शिक्षकचा अपवाद वगळता इतर सर्व निवडणुकांमध्ये बावनकुळेंच्या नेतृत्वाखालील भाजपाला (BJP) अपयश आल्याचे दिसत आहे. नाशिक, नागपूर, अमरावती व कोकण आणि मराठवाडा या दोन पदवीधर व तीन शिक्षक आमदारांच्या निवडणुका झाल्या. कोकण शिक्षक मतदारसंघाचा उमेदवार निवडण्यापासून तो निवडून आणण्यापर्यंत सारे श्रेय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आहे.
नाशिकमधील भाजपाने पाठिंबा दिलेले उमेदवार सत्यजीत तांबे स्वत:च्या तयारीवर निवडून आले आहेत. याउलट अमरावती पदवीधर व शिक्षक तसेच नागपूर शिक्षक मतदारसंघात भाजपाला सपशेल अपयश आहे. विदर्भाचे नेते असलेल्या बावनकुळे यांच्या प्रदेशाध्यक्षपदाच्या सहा महिन्यांच्या काळात झालेल्या निवडणुकीत पक्षाला भरघोस असे यश मिळालेले नाही. नाशिकमध्ये तर पक्षाला स्वत:चा उमेदवार देता आला नाही. सत्यजीत तांबे यांनाही उघड पाठिंबा देता आला नाही. दुसरीकडे नागपूर शिक्षक मतदारसंघात नागो गाणार यांना भाजपाचा पाठिंबा असूनही त्यांचा पराभव झाला.
कसब्याच्या निवडणुकीकडे राज्याचे लक्ष लागून राहिले होते. या निवडणुकीत स्वत: बावनकुळे पुण्यात तळ ठोकून होते. भाजपाची राज्यातील मोठी टीम पुण्यात प्रचाराला होती. प्रचंड नियोजन आणि सारी यंत्रणा लावूनदेखील कसब्यात भाजपाचा मोठा पराभव झाला. कसब्यात मोठा विजय मिळवू असा विश्वास बावनकुळे यांनी व्यक्त केला होता. मात्र, त्यांचे दावे आणि विश्वास वस्तुस्थितीपासून दूर असल्याचे कसब्यातील निकालावरून स्पष्ट झाले. या पराभवाने भाजपाला मोठा धक्का बसला आहे. खरेतर मोठ्या वल्गना करणारे बावनकुळे प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून घवघवीत यशापासून दूरच आहेत.