मुंबई – राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे विरोधीपक्षनेते झाले. विरोधीपक्षनेतेपदावर विराजमान झाल्यापासून अजित पवार सत्ताधारी भाजपवर सातत्याने हल्लाबोल करत आहेत. त्यातच आज अजित पवार यांनी दिलेल्या दिलखुलास मुलाखतीत मोठा गौप्यस्फोट केला आहे. कसबा पोटनिवडणुकीच्या निकालाचा शिंदे सरकारवर काही परिणाम होणार की नाही, हे सांगता येत नाही. पण त्या दोघांना एकत्र येऊन पराभव पत्करावा लागला आहे. आता त्यांच्यासोबतच्या आमदारांना वाटणारच मताची वजाबाकी भरून काढावी लागेल. काहीही झालं तरी सर्वसामान्य जनता बाळासाहेब ठाकरेंना मानते. त्यांच्याकडे पाहुनच शिवसेनेला मतदान करते.
शिवसेनेच्या मतदारांनी, कार्यकर्त्यांनी आणि रणरागिनींनी ठरवलं तर उद्या उद्धव ठाकरे सांगतील त्या उमेदवाराला आणि सांगतील त्या चिन्हावर मदतान करतील, असा विश्वासही अजित पवार यांनी बोलून दाखवला. दरम्यान जूनमध्ये गेलेलं सरकार पुन्हा आणण्यासाठी काय आखणी केली पाहिजे, मताची विभागणी कशी रोखायची, याचा विचार आणि प्रयत्न करत आहोत. आपण आता त्या गटाकडून निवडून येऊ शकत नाही आणि महाविकास आघाडी पुन्हा येईल, अशी परिस्थिती झाली की, गेलले अनेकजण परत येतील. आम्ही सगळ्यांचा विचार करणार नाहीत. पण इलेक्टीव्ह मेरीट असणाऱ्यांचा विचार नक्की करू असंही अजित पवार यांनी म्हटलं.
याआधी देशात अनेक नेत्यांचा करिष्मा होता. कधीकाळी इंदिराजींकडे, राजीवजींकडे पाहून, वाजपेयी यांच्याकडे पाहून मतदान झालेलं आपण पाहिलं आहे. शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरेंकडे पाहून मतदान झालं, असही पवार यांनी नमूद केलं.