मुंबई : कसब्यात महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा विजय झाला. तब्बल 28 वर्षानंतर भाजपकडून कसब्याची जागा हिरावून घेण्यात महाविकास आघाडीला यश आलं. कसब्याच्या विजयानंतर महाविकास आघाडीतील नेत्यांनी भाजपवर सडकून टीका करण्यास सुरुवात केली आहे. आजच्या दैनिक ‘सामना’च्या अग्रलेखातून तर हा तर हुकूमशहा आणि ठोकशहांच्या तोंडावर मारलेला तमाचाच आहे, असं म्हटलं आहे. तसेच भाजपचा पराभव करण्याचा मंत्र कोणता आहे? कसब्याच्या विजयाचा अर्थ काय? हे दैनिक ‘सामना’तून स्पष्ट करण्यात आलं आहे.

कसब्याच्या निकालातून भ्रमाचा भोपळा फुटला असल्याचा संदेश दिला आहे. केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशातही भाजपच्या विरोधात किती असंतोष खदखदत आहे, याचा संदेशच या निकालातून देण्यात आला आहे. एकास एक उमेदवार दिला तर भाजपचा पराभव करणं शक्य आहे. त्यामुळे विरोधकांनी आपल्या मतांमध्ये वजाबाकी होऊ न देणे आणि बेरीज करणे महत्त्वाचे आहे. हाच भाजपच्या पराभवाचा मंत्र आहे. तसेच कसब्याच्या निकालाचा अर्थ आहे, असं दैनिक ‘सामना’च्या अग्रलेखातून स्पष्ट केलं आहे. आज पुण्यात जल्लोष सुरू झाला आहे. 2024मध्ये महाराष्ट्रासह देशात जल्लोष सुरू होईल, असंही अग्रलेखात नमूद करण्यात आलं आहे.

अधिक वाचा  पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण

चिंचवडमध्ये केवळ तिरंगी लढतीमुळे महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पराभव झाला. दुरंगी लढत झाली असती तर भाजपचा पराभव झाला असता. दुरंगी लढतीमुळे खोकेशाहीच्या नादाला लागलेल्या भाजपला महाराष्ट्रात काय, देशातही तोंड दाखवायला जागा राहिली नसती. कसब्यावर भाजपची 28 वर्षापासून पकड होती. पण या विजयात 28 वर्षापासून ओरिजिनल शिवसेनेचेही तेवढेच योगदान होते. आता डुप्लिकेट शिवसेना सोबत घेतली आणि पराभव झाला, अशी टीका अग्रलेखातून करण्यात आली आहे.

मुस्काट फोडणारे परिवर्तन
कसब्यासाठी अख्ख मंत्रिमंडळ प्रचारात उतलं. अमित शाह सुद्धा पुण्यात येऊन गेले. धनशक्तीचे ब्रह्मास्त्र महाशक्तीने वापरून पाहिले. पण तरीही शेवटी भ्रमाचा भोपळा फुटायचा तो फुटलाच. महाराष्ट्रात जी गद्दारी झाली त्या गद्दारीचे मुस्काट फोडणारे परिवर्तन कसब्यात झाले. ही तर विजयाची ठिणगी आहे. आता वणवा पेटल्याशिवाय राहणार नाही, असंही अग्रलेखातून म्हटलं आहे.

अधिक वाचा  राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे महेश मांजरेकरांना जीवनगौरव विशेष पुरस्कार जाहीर

तोंडावर मारलेला तमाचाच
कसब्याचा निकाल म्हणजे लोकशाहीचे हत्याकांड घडवून गद्दारांच्या खोकेशाहीला राजवस्त्रे देणाऱ्या हुकूमशहा आणि ठोकशहांच्या तोंडावर जनतेने मारलेला तमाचाच आहे. महाराष्ट्रासह देशातही किती असंतोष खदखदत आहे हे यातून दिसून आलं आहे, असा चिमटाही अग्रलेखातून काढण्यात आला आहे.