पुणे : शहरात एकहाती अंमल राखून भारतीय जनता पक्षाला बळ देईल, असे नेतृत्त्व शहर भाजपमध्ये नसल्यामुळे पक्षाची पंचाईत झाली आहे. त्यामुळे हजारो कार्यकर्ते, शेकडो नेते परंतु, शहरासाठीच्या नेत्याचा अभाव, अशी स्थिती भाजपची झाली आहे. कसब्याच्या निवडणूक निकालामुळे शहरातील स्थानिक एकहाती नेतृत्त्व, हा मुद्दा पुढे आला आहे. त्यामुळे आगामी काळात मध्ये कशा घडामोडी होणार, याकडे भाजपच्या कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पुण्यात दांडगा संपर्क आहे आणि वावरही ! चंद्रकांत पाटील यांच्याकडे तर, पुण्याचे पालकमंत्रीपदच आहे. त्यांनीही पुण्यात जमवून आणि जुळवून घेण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे. परंतु, दोन्ही नेते पुण्याबाहेरील आहेत. पुण्यासारख्या शहरात भाजपला भरभरून मिळालेले असताना, शहर स्तरावरच्या स्थानिक नेतृत्त्वाचा अभाव जाणवतो, अशी भावना कसब्याच्या पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यावर भाजप कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहे. गिरीश बापट यांच्या आजारपणामुळे तर ही उणीव प्रकर्षाने जाणवते, असाही सूर व्यक्त होत आहे. बापट यांच्याकडे नेतृत्त्व होते, तेव्हाही ‘पीएमआरडीए’च्या अध्यक्षपदावरून काढण्यात आले होते, अशी आठवणही कार्यकर्ते सांगत आहेत.
भाजपमध्ये आमदार माधुरी मिसाळ, भीमराव तापकीर हे वरिष्ठ आमदार तर, मुरलीधर मोहोळ, जगदीश मुळीक, सिद्धार्थ शिरोळे आदी दुसऱ्या फळीतील नेते आहेत. परंतु, मिसाळ, तापकीर यांचा वावर प्रामुख्याने मतदारसंघातच आहे तर, बाकीच्या नेत्यांना पुढे येण्यासाठी आणखी काही कालावधी लागणार आहे. अशा परिस्थितीत पुणे महापालिकेच्या निवडणुकीतील उमेदवारी वाटप ही फडणवीस, पाटील यांच्यावरच अवलंबून असेल. पुण्यासारख्या शहराला भाजपमध्ये स्थानिक नेतृत्त्व नाही, हा सल अनेक कार्यकर्त्यांना आहे.
भाजपची २०१४ मध्ये केंद्रात, राज्यात सत्ता आली. त्यानंतर फडणवीस यांचे पुण्याशी जमत गेले. पक्षाने पाटील यांना २०१९ च्या विधानसभा निवडणुकीदरम्यान पुण्यात कोथरूड विधासनभा मतदारसंघातून लॉंच केले. त्यानंतर पाटील यांनी जाणीवपूर्वक पुण्याशी जवळीक वाढविण्याचा प्रयत्न केला आणि तो सुरूच आहे.
लोकसभेच्या २०१९ च्या निवडणुकीत गिरीश बापट खासदार झाले. तत्पूर्वी ते राज्याच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री होते. त्यावेळी ते पुण्याचे पालकमंत्री होते. त्यांच्या नेतृत्त्वाखाली झालेली २०१७ ची महापालिकेची निवडणूक भाजपने यशस्वीरित्या जिंकली. या काळात बापट यांच्याकडे पुण्याचे एकहाती नेतृत्त्व आहे, अशी परिस्थिती निर्माण झाली. परंतु, बापट दिल्लीत गेल्यावर फडणवीस आणि पाटील यांनी पुण्याशी नाते जोडले.
मात्र, जून २०२२ मध्ये राज्यात भाजपचे एकनाथ शिंदे गटाच्या मदतीने सरकार आले. पाटील यांच्याकडे पुण्याचे पालकमंत्रीपद सोपविण्यात आले. त्यानंतर पुण्यातील भाजपमध्ये पाटील यांच्या शब्द अंतिम झाला. कसब्याच्या पोटनिवडणुकीची सूत्रे सुरवातीला पाटील यांच्याकडे होती. अंतिम टप्प्यात आव्हान खडतर असल्याचे लक्षात आल्यावर देवेंद्र फडणवीस यांनी त्यात सर्वांर्थाने लक्ष घातले. अनेक महत्त्वाच्या व्यक्ती, समाजघटक आणि काहींना त्यांना फोन केले.
माजी नगरसेवकांची शाळा घेऊन त्यांचा वेग वाढविला. मतमोजणीच्या दिवशी ते तासा-तासाला माहिती घेत होते, इतके त्यांचे लक्ष कसब्यावर होते. पाटील यांनीही पहाटेपासून रात्रीपर्यंत नानाविध प्रयत्न केले. त्यांनी, फडणवीस यांनी आटोकाट प्रयत्न केला तरी भाजपची यंत्रणा मतदाराचे हृदयपरिवर्तन करू शकली नाही. त्यामुळे पक्ष पुढील काळात स्थानिक नेतृत्त्व पुढे आणणार का, असा प्रश्न कार्यकर्ते विचारत आहेत.