पुणे : कसबा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीमध्ये बालेकिल्ला म्हणून घेणाऱ्या भाजपचा दारुण पराभव झालेला आहे. काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी अकरा हजार चाळीस मतांनी दणदणीत विजय मिळवत भाजप महायुतीचे उमेदवार हेमंत रासने यांना धूळ चारली.

विशेष म्हणजे 1991 च्या कसब्यातील पोटनिवडणुकीमध्ये देखील भाजपचा पराभव झालेला होता आजच्या निकालाने पुन्हा एकदा ३२ वर्षापूर्वीची पुनरावृत्ती झालेली आहे. कसबा विधानसभा मतदारसंघात काटे की टक्कर होणार असल्याचे चित्र सुरुवातीपासूनच होते. त्यामुळे भाजप आणि काँग्रेसने मोठी ताकद या मतदारसंघात लावलेली होती. विशेष म्हणजे भाजपचे हेमंत रासने यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यामध्ये काही दिवस मुक्काम ठोकलेला होता.

अधिक वाचा  मुंबईतील दिगंबर जैन मंदिर पाडणाऱ्या अधिकाऱ्यांना निलंबित करा; मंदिराच्या पुनबांधणीची कारवाई करा सकल जैन समाजाची मागणी

त्याचप्रमाणे मंत्री गिरीश महाजन, रवींद्र चव्हाण, चंद्रकांत पाटील प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे या बड्या नेत्यांनी पुण्यात बैठका घेऊन मिळावे घेऊन जोर लावलेला होता. प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यामध्ये मोठ्या प्रमाणात पैसे वाटप केल्याचा आरोप देखील काँग्रेसने केलेला होता. तर भाजपची यंत्रणा कामाला लागल्याने ही निवडणूक चुरशीचीच होईल असे सांगितले जात होते. मात्र, प्रत्यक्षात आज मतमोजणी सुरू झाल्यानंतर पहिल्या फेरीपासून रवींद्र धंगेकर यांनी आघाडी घेतली. ही आघाडी शेवटच्या फेरीपर्यंत टिकवून ठेवत 11 हजार 40 मतांनी विजय मिळवलेला आहे.

भाजपसाठी धक्कादायक म्हणजे प्रभाग क्रमांक 15 येथे भाजपचा हक्काचा मतदार असताना देखील त्या प्रभागात अवघ्या तीन ते साडेतीन हजाराचे मताधिक्य भाजपला मिळाल्याचे सांगितले जात आहे. 2019 च्या निवडणुकीमध्ये या ठिकाणावरून मुक्ता टिळक यांना तब्बल 21000 मतांचे मताधिक्य मिळाले होते. पण हे मताधिक्य कमी करण्यात रवींद्र धंगेकर यांना यश आल्याचे आता या निकालावरून स्पष्ट झालेले आहे.

अधिक वाचा  ”वकिलीचा दुरुपयोग, गावकऱ्यांनी मारहाण केलीच नाही” बीड प्रकरणात गावच्या महिला सरसावल्या

1991 ला झालेल्या पोटनिवडणुकीमध्ये तेव्हाचे काँग्रेसचे उमेदवार वसंत उर्फ तात्या थोरात यांनी भाजपचे उमेदवार गिरीश बापट यांचा जवळपास साडेपाच ते सहा हजार मतांनी पराभव केलेला होता. हीच पुनरावृत्ती या निवडणुकीमध्ये झाली असून काँग्रेसने भाजपचा ताब्यातून तब्बल 32 वर्षानंतर कसबा मतदारसंघ काढून घेतलेला आहे.

विसाव्या फेरीनंतर झालेले एकूण मतदान आणि मताधिक्य

रवींद्र धंगेकर – 72 हजार 599

हेमंत असणे – 61 हजार 771

धंगेकर ११ हजार ४० मतांनी विजयी.