आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनामुळे कसबा विधानसभेसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. येते निवडणुकीत भाजपकडून हेमंत रासने, तर महाविकास आघाडीतील काँग्रेसकडून रवींद्र धंगेकर यांच्यात थेट सामना झाला. दरम्यान भाजप आणि महाविकास आघाडीकडून राज्यातील बड्या नेत्यांनी प्रचार केल्याने कसब्याचे वातावरण चांगलेच ढवळून निघाले होते. त्यामुळे मतदानाचा टक्का वाढण्याची शक्यता होती.. मात्र तसे झाल्याचे दिसून आले नाही.
कसबा विधानसभा मतदार संघ 2009 मध्ये अस्तित्वात आला. या मतदार संघात दोन लाख 75 हजार 428 मतदार आहेत. या पोटनिवडणुकीत 50 टक्के मतदान झाले आहे. दरम्यान कसब्यात 2009 मध्ये 49.7 टक्के, 2014 मध्ये 61.57 टक्के, तर 2019 मध्ये 51.62 टक्के मतदान झाले होते.
कसब्यात भाजप, काँग्रेससह इतर पक्षांसह अपक्ष असे १६ उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. दरम्यान सकाळी सात वाजता मतदानास सुरूवात झाली होती. सकाळ ते दुपारी तीन वाजेपर्यंत मतदानास संथ प्रतिसाद दिसून आला. मात्र दुपारनंतर मतदारांनी मतदान केंद्राबाहेर लांब रांगा लावल्याचे दिसून आले.
कसबा विधानसभेच्या पोटनिवडणुकीत 50 टक्के मतदान झाले. त्यातील पहिल्या टप्प्यात सकाळी 7 ते 9 वाजेपर्यंत कसब्यात 6.5 टक्के, 11 वाजेपर्यंत 8.25 टक्के, दुपारी एक वाजेपर्यंत 18.5 टक्के, दुपारी तीन वाजेपर्यंत 30.5 टक्के, सायंकाळी पाच वाजेपर्यंत 45.25 टक्के मतदान झाले होते.
भाजपने सुरूवातीस ही निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न केला. त्यास विरोधकांनी प्रतिसाद दिला नाही. दरम्यान भाजपकडून टिळक कुटुंबासह भाजपमधील अनेकजण येथून लढण्यासाठी इच्छूक होते. भाजपने मात्र रासने यांना उमेदवारी दिली. महाविकास आघाडीतही इच्छुकांची संख्या मोठी होती. अखेर काँग्रेसने धंगेकर यांना उमेदवारी दिली. दरम्यान बंडखोरांना शांत करण्यात आल्याने येथे रासने-धंगेकर अशी थेट लढत झाली.
कसब्यात भाजप आणि महाविकास आघाडीकडून बड्या नेत्यांनी प्रचार केला. येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पंकजा मुंडे, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रचार केला.
महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्षनेते अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, ठाकरे गटाचे अदित्य ठाकरे, धनंजय मुंडे, भास्कर जाधव या नेत्यांनी तोफ डागली. महाविकास आघाडीचे सरकार पडल्याच्या पार्श्वभूमीवर दोन्ही बाजूने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. त्यामुळे पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का वाढण्याची शक्यता वर्तविली जात होती.
धंगेकरांचा भाजपवर आरोप
महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी मतदानात पैशाचा आणि पोलीस यंत्रणांचा वापर भाजपकडून होत असल्याचा आरोप केला. त्यांनी केलेल्या या आरोपामुळे राजकारण तापल्याचे पाहायला मिळाले.
रासनेंकडून आचारसंहिता शिस्तीचा भंग?
भाजप उमेदवार हेमंत रासने अडचणीत येण्याची शक्यता आहे. हेमंत रासने यांनी थेट मतदान केंद्रात पक्षचिन्ह असलेला रुमाल वापरला असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आचारसंहिता शिस्तीचा भंग झाल्याचा आरोप त्यांच्यावर होत आहे.
अनेकजण मतदानापासून वंचित?
कसबा पेठ पोटनिवडणूक अनेक कारणामुळे चर्चेत आहे. मतदार यादीत नाव नसल्याने काही ठिकाणी मतदारांना मतदान करता आले नाही. तर काही मतदार याद्यांमध्ये मयतांची नावे आहेत. त्यामुळे अनेकांना मतदानाचा अधिकार बजावण्यात आला नसल्याने नाराजी व्यक्त केली आहे.