पुण्यातील कसबा आणि चिंचवड या विधानसभेच्या दोन जागांसाठी आज (२६ फेब्रुवारी) मतदानाची प्रक्रिया पार पडली. ही निवडणूक विरोधी पक्षनेते अजित पवार तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिष्ठेची केली होती. या निवडणुकीत भाजपा उमेदवारांच्यां प्रचारात देवेंद्र फडणवीस यांनीदेखील उडी घेतली. हाच मुद्दा घेऊन आज (२६ फेब्रुवारी) अजित पवार यांनी राज्य सरकारवर टीका केली. राज्यातील विकासकामे ठप्प आहेत. सत्ताधारी पोटनिवडणुकीच्या प्रचारात व्यस्त आहेत, असे पवार म्हणाले. पवारांच्या याच टीकेला आता देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले आहे. आमचे २४ तास काम सुरूच असते. प्रचारात उतरलो तरी आमचे काम थांबत नाही, असे फडणवीस म्हणाले. ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.

अधिक वाचा  एकनाथ शिंदे दिलेला शब्द पाळणार, विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी ‘या’ नेत्याला देणार संधी

“आम्ही पोटनिवडणुकीच्या प्रचाराला गेलो, त्यामुळे अजित पवार यांच्या पोटात फार दुखत आहे. आम्ही दोन ते तीन दिवसच प्रचारासाठी गेलो. मात्र मी त्यांना आठवण करून देतो की, पंढरपूरच्या पोटनिवडणुकीत तेव्हा अजित पवार पूर्णवेळ तिथे बसले होते. नांदेडमध्ये निवडणूक होती, तेव्हा अशोक चव्हाण पूर्णवेळ तिथे बसले होते. निवडणुका आहेत. त्यामुळे प्रचारासाठी गेलं तर त्यात एवढं पोटात दुखण्यासारखं काय आहे?” असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी केला.

आमचे सरकार गतीमान- देवेंद्र फडणवीस

“आम्ही प्रचारासाठी गेलो असलो तरी सरकारचे काम कोठेही थांबलेले नाही. आमच्या सरकारने अतिशय वेगाने निर्णय घेतलेले आहेत. महाविकास आघाडी सरकारने त्यांच्या काळात शेतकऱ्यांना एकूण ६ हजार कोटी रुपये दिले. आम्ही सातच महिन्यात मदतीचे तसेच ५० हजार रुपये असे मिळूण एकूण १२ हजार कोटी रुपये दिले. आमचे सरकार गतीमान आहे,” असे फडणवीस म्हणाले.

अधिक वाचा  औरंगजेबच्या कबरीवरून उपमुख्यमंत्री शिंदेंचं मोठं विधान, काँग्रेसवरही पलटवार; म्हणाले…

आम्ही २४ तास काम करतो- देवेंद्र फडणवीस

“केवळ सात महिन्यांत २३ प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता दिली आहे. महाविकास आघाडीच्या काळात सुधारित प्रशासकीय मान्यताच मिळत नव्हती. तेव्हा सगळे प्रकल्प बंदच होते. आमचे सरकार गतीमान आहे. आम्ही एखाद्या निवडणुकीत प्रचाराला गेलो, तरी आम्ही २४ तास काम करतो. आमचे काम कोठेही मागे राहात नाही. त्यामुळे अजित पवार यांच्या पोटात दुखण्याचे कारण नाही,” असा टोलाही फडणवीस यांनी अजित पवार यांना लगावला.