महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्या दि. २७ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे समर्थक व विधिमंडळातील शिवसेना पक्षाचे प्रतोद भरत गोगावले यांनी शिवसेना आमदारांसाठी व्हीप बजावला केला आहे. यामध्ये ठाकरे गटाच्या आमदारांना देखील व्हिप बजावलेला आहे. यामुळे आता पुन्हा अधिवेशनात ठाकरे गट विरूद्ध शिंदे गट असा संघर्ष पाहायला मिळण्याची शक्यता आहे. शिवसेना प्रतोद भरत गोगावले म्हणाले, “शिवसेनेच्या सर्व आमदारांना व्हीप बजावण्यात आलेला आहे. शिवसेनेच्या आमदारांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनाला पूर्ण वेळ हजर राहायचे आहे, असा व्हिप बजावलेला आहे. शिवसेनेच्या सर्व ५५ आमदारांना व्हिप बजावण्यात आलेला आहे.
सर्वोच्च न्यायालयाने ठाकरे समर्थक आमदारांना व्हीपपासून संरक्षण दिलेले असताना, सर्व आमदारांना व्हीप कसा बजावण्यात आला? असा प्रश्न विचारल्यावर गोगावले म्हणाले, “आम्ही कोणावर ही कारवाई करणार नाही. परंतु अधिवेशनाला हजर राहण्याबाबत सांगणे ही कारवाई होत नाही. सर्व आमदारांनी अधिवेशनास पूर्ण वेळ हजर राहावं. यानंतर कळेल की, कोण हजर राहतं आणि कोण राहत नाही. दरम्यान, महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावरच्या सर्वोच्च न्यायालयातील सुनवाईमध्ये ठाकरे समर्थक आमदारांना शिवसेना पक्षाच्या व्हीपपासून संरक्षण मिळाले होते. गोगावले यांच्या व्हिपचं पालन न केल्यास, ठाकरे गटाच्या आमदारांवर कारवाई होणार नाही.