भारतीय जनता पक्षानं पोलिसांना सोबत घेऊन पैसे वाटप केल्याचा आरोप काँग्रेसचे कसबा मतदारसंघाचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी केला आहे. याचा निषेध करण्यासाठी धंगेकर आज (25 फेब्रुवारी) कसबा गणपतीसमोर उपोषण करणार आहेत. कसबा पेठेतील रविवार पेठ, गंज पेठ आणि बहुतांश भागात भाजपकडून पैशाचे वाटप सुरू केले आहे. या संपूर्ण प्रकारात पोलिसही सहभागी असल्याचा आरोप धंगेकर यांनी केलाय.
सकाळी 10 वाजता उपोषणाला सुरुवात होणार
भाजपने पैसे वाटप केल्याचा आरोप रविंद्र धंगेकर यांनी केलाय. याचा निषेध करण्यासाठी धंगेकर आज कसबा गणपतीसमोर उपोषण करणार आहेत. सकाळी 10 वाजता त्यांचे उपोषण आणि धरणे आंदोलनला सुरुवात होणार आहे. यावेळी महाविकास आघाडीचे इतर कार्यकर्ते सुद्धा उपस्थित राहणार आहे.
कसबा मतदारसंघात रविंद्र धंगेकर विरुद्ध हेमंत रासने तगडी लढत
कसबा मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांनी भाजपसमोर तगडं आव्हान उभं केलं आहे. त्यामुळं भाजपचे धाबे दणाणले आहेत, अशी चर्चा मतदारसंघात सुरु आहे. त्यामुळं धंगेकरांच्या प्रत्येक हालचालीवर भाजपच्या कार्यकर्ते आणि नेते मंडळींकडून बारीक लक्ष ठेवण्यात येत आहे. धंगेकर मागील 25 वर्षांपासून कसबा मतदारसंघातील विविध प्रभागांमधून निवडून आले आहेत. त्यामुळं कसब्यातील काही भाग सोडला तर बाकी सगळ्या प्रभागामध्ये रविंद्र धंगेकरांची चांगली पकड आहे. शिवाय त्यांची सामान्यांचे नेते म्हणून ओळख आहे. त्यामुळं कसब्यात हेमंत रासने विरुद्ध रविंद्र धंगेकर अशी जोरदार लढत बघायला मिळत आहे.
हेमंत रासनेंच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा रोड शो
दरम्यान, काल चिंचवड आणि कसबा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या प्रचाराचा शेवटचा दिवस होता. या शेवटच्या दिवशी हेमंत रासने यांच्या प्रचारासाठी थेट राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रोड शो केला. त्यानंतर त्यांनी भाजपच जिंकणार असा विश्वास व्यक्त केला. या रोड शो नंतर एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला. पुण्याचा विकास करणारा भाजप पक्ष आहे. त्यामुळं हेमंत रासने यांनाच मतदान करा, असं आवाहनही त्यांनी केलं. काल दिवसभर भाजप आणि महाविकास आघाडीकडून जोरदार प्रचार करण्यात आला. दोन्ही पक्षाच्या नेते आणि कार्यकर्त्यांनी रोड शो, पदयात्रा, शक्तीप्रदर्शन आणि घरोघरी जाऊन भेटी घेण्यावर भर दिला.