चिंचवड पोटनिवडणुकीच्या रणसंग्राम काँग्रेसच्या एक मोठ्या नेत्याने भाजपमध्ये प्रवेश केल्याने त्याचा फटका महाविकास आघाडीला बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. दोन दिवसापूर्वी काँग्रेसचे प्रदेश सचिव सचिन साठे यांचा राजीनामा दिला होता. त्यावेळी ते कुठल्या पक्षात जाणार हे त्यांनी स्पष्ट केले नव्हते. काल (गुरुवारी) सचिन साठे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. सचिन साठे यांनी प्रदेश सचिवपदासह काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे साठे यांनी राजीनामा पाठविला आहे.
चिंचवड पोटनिवडणुकीच्या तोडांवर साठे यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केल्याने पिंपरी-चिंचवडमधील राजकीय समीकरणे बदलणार अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. चिंचवड मतदारसंघातील पिंपळेनिलख भागातील साठे हे गेल्या २६ वर्षांपासून काँग्रेस पक्षाचे काम करीत होते. गेल्या काही दिवसांपासून साठे यांची पक्षीय पातळीवर मोठ्या प्रमाणावर घुसमट होत असल्याने त्यांनी राजीनामा दिल्याचे समजते.
सचिन साठे यांनी पक्षाच्या व्यासपीठावर वेळोवेळी अनेक मुद्दे मांडले, त्याकडे पक्षाने गांभीर्याने पाहिले गेले नाही. पिंपरी-चिंचवड शहर पातळीवरील पक्षहितासाठी त्यांनी अनेक विषय उपस्थित केले, त्याचीही दखल घेतली गेली नाही. पक्षाकडून अशाप्रकारे होणारी उपेक्षा सहन करू शकत नाही. अशा परिस्थितीत यापुढे पक्षात थांबणे योग्य नाही,” अशी भावना झाल्याने स्वखुशीने राजीनामा दिला असल्याचे साठे यांनी दोन दिवसापूर्वी सांगितले होते.