दिवंगत आमदार लक्ष्मण जगतापांच्या निधनानंतर चिंचवड पोटनिवडणूक जाहीर झाली. ही निवडणूक अगोदर बिनविरोध होणार अशी चर्चा असतानाच भाजपनं तिथं अश्विनी जगतापांना उमेदवारी दिली. तर राष्ट्रवादीची जागा असताना दुसरीकडे ठाकरे गटानं चिंचवडची जागा लढण्यासाठी आग्रही भूमिका घेतली. पण उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी काही तास शिल्लक राहिलेले असताना राष्ट्रवादीनं अखेरच्या क्षणी आपली चाल खेळत नाना काटे यांना उमेदवारी जाहीर केली. इथेच आघाडीत मिठाचा खडा पडला. चिंचवड पोटनिवडणुकीत उमेदवारीसाठी प्रचंड आग्रही असलेल्या नाराज राहुल कलाटेंनी थेट महाविकास आघाडी आणि पक्षाविरोधात दंड थोपटत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. यामुळे आघाडीची डोकेदुखी वाढण्याची शक्यता होती.

त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार, उध्दव ठाकरे,संपर्कप्रमुख सचिन अहिर यांनी कलाटेंचा उमेदवारी मागे घेण्यासाठी जोरदार प्रयत्न केले. तरीदेखील त्यांनी आपली अपक्ष उमेदवारी कायम ठेवली. यानंतर ठाकरे गटानं कलाटेंवर कडक कारवाईचे संकेतही दिले. पण इतके दिवस उलटूनही कलाटेंवर कोणतीही कारवाई करण्यात आलीच नाही. ना त्यांचं पक्षातून निलंबन झालं ना हकालपट्टी करण्यात आली. अखेरच्या क्षणापर्यंत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार व शिवसेना ( उध्दव बाळासाहेब ठाकरे ) पक्षप्रमुख उध्दव ठाकरे आणि महाविकास आघाडीच्या नेतेमंडळींनी अपक्ष उमेदवार राहुल कलाटेंनी पोटनिवडणुकीतून आपला उमेदवारी अर्ज मागे घ्यावा यासाठी जोरदार प्रयत्न केले. पण थेट उध्दव ठाकरेंचा आदेश धुडकावत चिंचवडच्या पोटनिवडणुकीत कलाटे यांनी आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवल्यामुळे त्यांच्यावर कारवाई होईल अशी अपेक्षा होती. पण ती फोल ठरली.

अधिक वाचा  नागपूर हिंसेनंतर औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी सुरक्षा कुणाकडे? औरंगजेबाची कबर कुणाच्या अख्त्यारित सरकार ती हटवू शकते? तोडफोड झाल्यास काय होऊ शकते शिक्षा?

ठाकरे गटाकडून बंडखोर कलाटेंवर कडक कारवाई करणार असल्याचा फक्त गाजावाजा करण्यात आला. एकीकडे त्यांच्या प्रचारात सहभागी झाल्यामुळे आठ पदाधिकाऱ्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. मात्र, याचवेळी थेट उध्दव ठाकरेंचा आदेश धुडकावत उमेदवारी अर्ज कायम ठेवलेल्या कलाटेंवर पक्षानं कोणतीही कारवाई केलेली नाही. यामुळे राजकीय वर्तुळात सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. तसेच ठाकरे गटाचा कलाटेंच्या उमेदवारीला अप्रत्यक्षपणे पाठिंबा आहे की काय असा सवालही उपस्थित करण्यात येत आहे. ठाकरे गटाचे नेते व आमदार आदित्य ठाकरे यांनी चिंचवड पोटनिवडणुकीत आत्तापर्यंत राष्ट्रवादीचे उमेदवार नाना काटेंचा जोरदार प्रचार केला आहे. त्यांनी आधी कार्यकर्ता मेळावा आणि नंतर रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र,यावेळी ठाकरेंनी भाजपवर टीका केली.

अधिक वाचा  निवडणूक आयोगाचा निर्णय! राजकीय एजंटना पहिल्यांदाच कायदेशीर प्रशिक्षण आता१२०० पेक्षा जास्त मतदार कोणत्याही केंद्रावर नसणार

यावेळी ठाकरेंनी अपक्ष उमेदवार कलाटेंवर कारवाई करण्याविषयी चकार शब्दही काढला नव्हता. याचमुळे कलाटेंवर कारवाई करण्यास ठाकरे का कचरत आहेत अशी विचारणा केली जात आहेत. तसेच राहुल कलाटेंचा पक्षावर इतका दबाव, प्रभाव आहे की पक्षप्रमुखांनाही त्यांच्यावर निलंबन आणि हकालपट्टीची कारवाई करण्याबाबत दुटप्पी भूमिका घ्यावी लागत आहे.

राहुल कलाटेंनी बंडखोरीची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही विधानसभेच्या २०१९ च्या निवडणुकीवेळी चिंचवडमधून कलाटेंनी बंडखोरी केली होती. अपक्ष म्हणून लढलेल्या कलाटेंचा पराभव स्वीकारावा लागला पण त्यात त्यांचा पराभव झाला. तरीही त्यांच्याविरुद्ध पक्षानं कोणतीही कारवाई केली नाही. गेल्यावर्षी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीवर सदस्य म्हणून अश्विनी चिंचवडे यांची नियुक्तीचा पक्षादेश डावलून कलाटेंनी स्वत:ची तिथे वर्णी लावून घेतली. तरीही पक्षानं त्यांच्याविरुद्ध शिस्तभंगतेची कारवाई केली नाही

अधिक वाचा  आळंदीच्या या भागात अफुची लागवड, जगताप मळा रस्त्यावर पोलिसांचा छापा अफुची ६६ झाडे महिला गजाआड

आता पोटनिवडणुकीत पक्षासह आघाडी धर्मालाच कात्रजचा घाट दाखवत उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर कलाटेंवर कोणतीही कारवाई केलेली नाही. विशेष म्हणजे ठाकरे गटाशी युती असलेल्या वंचित बहुजन आघाडीनं महाविकास आघाडीच्या उमेदवाराऐवजी कलाटेंना पाठिंबा दिला आहे. यामुळे ठाकरेंच्या कलाटेंविषयी भूमिकेवर शंका उपस्थित केली जात आहे.