कसबा आणि चिंचवडमध्ये पोटनिवडणुकीत भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने आपले उमेदवार दिले आहेत. कसब्यात भाजपचे हेमंत रासने तर काँग्रेसचे रवींद्र धंगेकर असा सामना सुरू आहे. तर चिंचवडमध्ये भाजपच्या अश्विनी जगताप आणि राष्ट्रवादीचे नाना काटे आमनेसामने आहेत. या निवडणुकीत महाविकास आघाडीचा घटक या नात्याने ठाकरे गटाने कसब्यात रवींद्र धंगेकर यांना तर चिंचवडमध्ये राष्ट्रवादीचे नाना काटे यांना पाठिंबा दिला. तर मनसेचे राज ठाकरे यांनी कसब्यात भाजपला मदत करण्याचे आदेश दिले आहेत. असे असतानाही कसब्यात मनसेचे काही कार्यकर्ते काँग्रेसचे उमेदवार धंगेकर यांना मदत करीत होते. त्यातील सात जणांवर हकालपट्टीची कारवाई करण्यात आली आहे.
मनसे नेते बाळा नांदगावकर यांच्या उपस्थितीत आज पुण्याच्या शहर मध्यवर्ती कार्यालयात बैठक पार पडली. त्यावेळी त्यांनी कोणत्याही परिस्थितीत महाविकास आघाडीला मदत होणार नाही याची काळजी घ्या. जास्तीत जास्त भाजपला मतदान करण्यासाठी कामाला लागा. मनसे उघडपणे प्रचारात उतरणार नाही, मात्र मनसेची १०० टक्के मदत भाजपला व्हायला हवी, अशा सूचनाही नांदगावकरांनी कार्यकर्त्यांना केल्या आहेत. या बैठकीत आदेशाविरोधात काम करणाऱ्या सात जणांवर बाळा नांदगाकर, अनिल शिदोरे, राजेंद्र वागसकर यांनी हकालपट्टीची कारवाई केली आहे. यात रवींद्र खेडेकर, सागर पांगारे, गोपी घोरपडे, अनिल बांढांगे, रिझवान मिरजकर, प्रकाश ढमढेरे यांच्यावर कारवाई केली आहे. याबाबत साईनाथ बाबर यांनी प्रसिद्धी पत्रक काढून माहिती दिली.
आयोगाच्या निर्णयावर पवार स्पष्टच बोलले कसबा पोटनिवडणुकीत मनसेने भाजपला पाठिंबा दिला आहे. या निवडणुकीत राज ठाकरेंच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या काही जणांवर कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मनसेतील काही जण हे धंगेकर यांच्या बाजूने प्रचार करत असल्याच्या चर्चा राजकीय फडात रंगू लागल्या आहेत. पक्षविरोधी काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर होणार कारवाई होण्याची माहिती, विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. रवींद्र धंगेकर हे मनसेकडून दोनदा नगरसेवक होते. त्यामुळे त्यांचा मनसेतही चांगला संपर्क आहे. याबाबत धंगेकरांनी स्पष्टच सांगितले होते की, “पुणे शहरात माझे अनेक मित्र आहेत. मनसेत तर सर्वजण माझे सहकारी आहेत. ते मदत तर करणारच.”
त्यानंतर धंगेकरांनी मनसे कार्यालयात भेट दिली होती. तेथील फोटो व्हायरल झाला होता. यापुढे महाविकास आघाडीच्या उमेदवारासोबत मनसे कार्यकर्ते आढळून आल्यास पक्ष कारवाई करणार का हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे. चिंचवडमधील बंडखोर राहुल कलाटे यांच्यावर उद्धव ठाकरे यांनी अद्याप कारवाई केली नाही. मात्र आदेशाविरोधात काम करणाऱ्या आठ पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी केली. त्यामुळे उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर कसब्याबाबत मनसे काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागले होते.