सुप्रीम कोर्टामध्ये शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट वाद सुरु असतानाच निवडणूक आयोगाने () शिवसेना हे नाव आणि पक्षचिन्ह शिंदे गटाला देण्याचा निर्णय शुक्रवारी घेतला. या निर्णयानंतर शिंदे गटाने आनंदोत्सव साजरा केला असला तरी ठाकरे गटाने या निर्णयावरुन संताप व्यक्त करताना सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु असतानाच निर्णय घेतल्याबद्दल आक्षेप नोंदवला आहे. याच मुद्द्यावरुन बोलताना उद्धव ठाकरेंनी थेट निवडणूक आयोग बरखास्त करण्याची मागणी केली आहे. निवडणूक आयोगामधील नियुक्त्या निवडणुकींच्या माध्यमातूनच करण्याची मागणी उद्धव ठाकरेंनी केली. तसेच त्यांनी निवडणूक आयुक्तांवरही टीका केली. आता उद्धव यांनी निवडणूक आयोगासंदर्भात केलेल्या मागणीला भारतीय जनता पार्टीच्या एका माजी खासदारानेच पाठींबा दिला आहे.
कोण आहेत हे इलेक्शन कमिशनचे कमिश्नर? काय म्हटलं आहे?
भाजपाचे राज्यसभेवरील माजी खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी ट्विटवरुन उद्धव यांना पाठींबा जाहीर केला आहे. उद्धव ठाकरेंनी केलेली निवडणूक आयुक्तांबद्दलची मागणी योग्य असल्याचं स्वामी यांनी म्हटलं आहे. “निवडणूक आयोगाच्या आयुक्तांची हकालपट्टी करावी या उद्धव ठाकरेंच्या मागणीला माझा पाठिंबा आहे. यापूर्वी त्यांची (निवडणूक आयोगाच्या आयुक्तांचा) अर्थमंत्रालयातील कामगिरी संशयास्पद राहिली आहे,” असं स्वामी यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे. सध्या राजीव कुमार हे निवडणूक आयोगाचे कमिश्नर आहेत. 15 मे 2022 पासून ते या पदावर आहेत. त्यांचा कार्यकाळ फेब्रुवारी 2025 पर्यंत असणार आहे.
लोकशाही पद्धतीची शेवटची निवडणूक
शिंदे यांनी शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण या चिन्हावर दावा सांगितला होता. मागील आठवड्यामध्ये म्हणजेच शुक्रवारी यासंदर्भातील निर्णय निवडणूक आयोगाने दिला. त्यानंतर संतापलेल्या ठाकरेंनी निवडणूक आयोगावर पक्षपातीपणाचा आरोप केला. निवडणूक आयोगच बरखास्त करावं असी मागणी त्यांनी केली. पक्षाचे नाव आणि चिन्ह चोरीला गेलं असून हे चोरण्याचा विरोधकांचा पूर्वनियोजित कट असून उद्या अन्य पक्षांवरही अशी परिस्थिती ओढावू शकते असं उद्धव म्हणाले. 2024 ची लोकसभा निवडणूक ही देशातली लोकशाही पद्धतीने झालेली शेवटची निवडणूक ठरु शकते असं म्हणताना यापुढे हुकुमशाहीच पहायला मिळेल अशी भिती उद्धव यांनी व्यक्त केली.