पुणेः कसबा पेठ आणि पिंपरी चिंचवड पोट निवडणुकांसाठीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. चिंचवडमध्ये भाजप उमेदवार अश्विनी जगताप यांच्या उमेदवारीसाठी भाजपने दिग्गज नेत्यांना प्रचारात उतरवलं आहे. एरवी राज्यातील राजकारणापासून दूर असलेल्या पंकजा मुंडे यांनाही अॅक्टिव्ह केलंय. गेल्या काही वर्षांपासून पक्षांतर्गत राजकारणामुळे पंकजा मुंडे यांना डावलण्यात येतंय, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. पंकजा समर्थकांनी अनेकदा याविरोधात संतापही व्यक्त केलाय. चिंचवड येथील भाषणात पंकजा मुंडे यांनी केलेल्या एका वक्तव्यातून त्यांच्या मनातील खंत दिसून येतेय.

पंकजा मुंडे काय म्हणाल्या ?
एवढं सोपं नाही राजकारण. अनेक वर्ष खपल्यानंतरही लोकांना पदं मिळत नाहीत. अनेक वर्ष कष्ट केल्यानंतरही नेत्यांना संधी मिळत नाही. तरी आपल्या नेत्याकडे बघून कार्यकर्ता काम करत राहतो. आपल्या नेत्याला जिवंत ठेवण्यासाठी. जीवनातील सगळे महत्त्वाचे क्षण घालवत असतो. कारण तो नेता त्याला ताकद देत असतो. आज छत्रपती शिवाजी महाराजांना का फुलं अर्पण करतो. का? कारण शिवरायांचा बाणा पाहून आपल्याला आनंद वाटतो. स्वाभिमान वाटतो. ऊर्जा मिळते. हा नेता आपल्या कार्यकर्त्यांना ऊर्जा देत असतो. तो हयात असेल अथवा नसेल….

अधिक वाचा  संतोष देशमुख प्रकरणाची पहिली सुनावणी; वाल्मिकचा उतरला माज, कोर्टात आकाला पाहून चेलेही हादरले

लक्ष्मण भाऊंनी खूप केलं.. अनेक मोठी स्वप्न पाहिली. पिंपरी चिंचवडचा विकास करताना, जाचक कर माफ करताना कुणी लढलं असेल तर हेच लोकप्रतिनिधी लढले आहेत, अशा शब्दात पंकजा मुंडे यांनी अश्विनी जगताप यांचा प्रचार केला.

चिंचवड येथील भाजप उमेदवार अश्विनी जगताप यांचं भाषण ऐकून पंकजा मुंडे काही क्षण भावूक झाल्या. त्या म्हणाल्या, ‘ लोकसभेला गोपीनाथ मुंडे निवडून आले. तेव्हा मी म्हणाले आता तुम्ही पुढचं बघा,निवडून आले आणि 15 दिवसात मंत्री पदाची शपथ घेतली. मात्र त्यानंतर अवघ्या १७ दिवसांत त्यांचं निधन झालं. तेंव्हा मला आणि कुटुंबाला जो धक्का बसला. त्यातून आम्ही जसं सावरत आहोत. तेच मला अश्विनी जगतापांकडे पाहून जाणवलं. त्यांनी ज्यापद्धतीने भाषण केलं, संयमीपणे बोलल्या. हे पाहून मला अभिमान वाटला.

अधिक वाचा  सध्या धार्मिक उन्माद देशाचा माहौल आता मशिदी झाकून… हा संकुचितपणा… संजय राऊतांचा खरमरीत इशारा

वाघिणीसारखा बाणा…
पंकजा मुंडे म्हणाल्या, मला अनेकांनी विचारलं प्रचाराला का आलात? मी फक्त दिवंगत लक्ष्मण जगताप यांची बहीण म्हणून इथं आले. अश्विनी जगताप यांच्या प्रचारासाठी आले . माझ्यामध्ये लढण्यासाठी वाघिणीसारखा बाणा आहे.मुंडे साहेब असताना रणरागिणी म्हणायचे ते गेल्यानंतर वाघीण म्हणायला लागले. अश्विनी जगताप ह्या वाघीण म्हणून लक्ष्मण जगताप यांचं स्वप्न पूर्ण करत आहेत…