मुंबई : टीव्हीसह बॉलिवूड आणि ओटीटीवर आपल्या अभिनयाची छाप सोडणारे अभिनेते शाहनवाज प्रधान यांचं निधन झालं आहे. ते 56 वर्षाचे होते. एका सत्कार समारंभात गेले असता त्यांच्या छातीत अचानक दुखू लागलं. त्यामुळे ते तिथेच बेशुद्ध पडले. त्यामुळे त्यांना तात्काळ अंधेरीच्या कोकिळाबेन धीरुबाई अंबानी रुग्णालयात दाखल करण्यता आलं. तिथे उपचार सुरू असतानाच त्यांचं निधन झालं. हृदयविकाराच्या झटक्यामुळे त्यांचं निधन झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. मिर्झापूर या वेब सीरिजमध्ये शाहनवाज प्रधान यांनी गुड्डू भैयाच्या सासऱ्याची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका खूप गाजली होती. या भूमिकेमुळेच ते घराघरात पोहोचले होते. मात्र, अचानक त्यांचं निधन झाल्याने बॉलिवूडमधून शोक व्यक्त होत आहे.
काल संध्याकाळी ही दु:खद घटना घडली. शाहनवाज प्रधान हे एका कार्यक्रमात भाग घेण्यासाठी गेले होते. सत्कार समारंभाचा हा कार्यक्रम होता. कार्यक्रमात त्यांच्या छातीत कळ येऊ लागली. छातीत दुखत असल्याचं त्यांनी सांगितलं आणि बेशुद्ध पडले. त्यामुळे त्यांना तात्काळ रुग्णालयात नेण्यात आलं. पण त्यांची प्राणज्योत मालवली होती.
शाहनवाज प्रधान यांच्या निधनावर अभिनेते संदीप मोहन यांनी दु:ख व्यक्त केलं आहे. त्यांनीच शाहनवाज यांच्या मृत्यूची बातमीही दिली आहे. अत्यंत दु:खद मनाने सांगावं वाटतं की, श्रीकृष्णाचे नंद बाबा आणि लोकप्रिय अभिनेता सर्वांचे प्रिय शाहनवाज प्रधान यांचं आज अचानक निधन झालं आहे. शाहनवाज भाई हे आम्हा सर्वांना सीनियर होते. ते एक चांगले कलाकार होतेच, शिवाय ते चांगले व्यक्तीही होते. शाहनवाज भाई कंटिन्यूटीचे मास्टर होते, असं संदीप मोहन यांनी म्हटलं आहे.
चाहत्यांकडूनही श्रद्धांजली
शाहनवाज प्रधान यांच्या निधनावर त्यांच्या चाहत्यांनीही शोक व्यक्त केला आहे. शाहनवाज यांनी श्री कृष्ण मालिकेत नंद बाबाची भूमिका साकारली होती. अलिफ लैलामध्ये सिंदबाद जहाजींची भूमिका साकरली होती. त्यांच्या या दोन्ही भूमिका गाजल्या होत्या. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली, अशा शब्दात त्यांच्या फॅन्सनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.