पुणे: 2019 साली अजित पवारांसोबत झालेल्या शपथविधीबद्दल शरद पवारांशी चर्चा झाली होती, असा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. तसंच राष्ट्रवादी काँग्रेससोबत मंत्रिमंडळ आणि महामंडळाबाबतही चर्चा झाली होती. महाराष्ट्रातली राष्ट्रपती राजवट उठवण्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसने जे पत्र लिहिलं होतं, तेही मीच ड्राफ्ट केलं होतं, असा खळबळजनक दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला. यावर विरोक्षी पक्षनेते अजित पवार यांना विचारले असता त्यांनी यावर स्पष्ट भूमिका घेतली आहे.
काय म्हणाले अजित पवार?
या घटनेला 3 वर्ष होऊन गेले आहेत. मी बोलणार नाही हे मी सांगितले आहे. मी बोलणार नाही, म्हणजे बोलणार नाही. देवेंद्र फडणवीस यांचे बोलणे माझ्या कानावर आलेलं आहे. राज्यात अनेक विषय आहेत. त्याच्यावर काय होणार आहे का? मी फडणवीस यांना विचारेल की असे स्टेटमेंट यावेळी का केलं? पण, मी फडणवीस यांच्याशी बोललो नाही. यावेळी त्यांनी हे वक्तव्य का केले मला माहीत नाही, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी देत या विषयावर बोलणं टाळलं आहे.
शरद पवारांनी दावा फेटाळले
देवेंद्र फडणवीस यांच्या या दाव्यावर शरद पवार यांनी तासाभरात प्रतिक्रिया दिली. ‘मला वाटलं देवेंद्र हा सुसंस्कृत माणूस आहे, सभ्य माणूस आहे. असत्याचा आधार घेऊन ते अशाप्रकारची स्टेटमेंट्स करतील, असं मला कधी वाटलं नाही’, असं म्हणत शरद पवारांनी देवेंद्र फडणवीस यांचा दावा फेटाळून लावला. एकीकडे फडणवीसांच्या गौप्यस्फोटानंतर शरद पवार एक ते दोन तासांमध्ये माध्यामांसमोर आले आणि त्यांनी स्पष्टीकरण दिलं, पण अजित पवार यांनी मात्र अजूनही मौन बाळगलं आहे. पुण्यातल्या एका कार्यक्रमावेळी अजित पवार आले होते, यावेळी त्यांना मीडियाने गाठलं, पण काहीही न बोलता अजित पवार निघून गेले.
देवेंद्र फडणवीसांनी पवारांना डिवचलं
सकाळच्या शपथविधीबद्दल अजित पवारांना बोलू दे, मग मी पुढचं सांगतो, असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी अजितदादांना डिवचण्याचा प्रयत्न केला, पण फडणवसींच्या या विधानाच्या तीन दिवसानंतरही अजित पवारांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. ‘आमच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेसकडून ऑफर आली, की आम्हाला स्टेबल गव्हर्नमेंट हवंय, म्हणून आपण सरकार तयार करूया. अजितदादांनी आमच्यासोबत घेतलेली शपथ फसवणुकीच्या नाही तर प्रामाणिक भावनेतून घेतली होती. पण नंतर ते कसे तोंडघाशी पडले हे अजितदादा सांगतील, त्यांनी नाही सांगितलं तर मी सांगीन’, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते.