कसबा आणि चिंचवडची पोटनिवडणूक ही भाजप आणि महाविकास आघाडीसाठी प्रतिष्ठेची बनली आहे. त्यामुळे पुण्यात भाजप आणि महाविकास आघाडीचे दिग्गज नेते तळ ठोकून आहेत. भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी तर वेळ वाचवण्यासाठी कसबा मतदारसंघातच फ्लॅट भाड्याने घेतल्याची चर्चा आहे. एवढंच नाही तर काँग्रेसने यावेळी भाजपला धोबीपछाड द्यायचाच, असा चंगच बांधला आहे. त्यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्वत: पुण्यात तळ ठोकला आहे. तसेत राष्ट्रवादीचे अजित पवार हे देखील तळ ठोकून आहेत. त्यामुळे कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी भाजप आणि आघाडीने कंबर कसली आहे. या दोन्ही मतदारसंघात सर्वच पक्षाकडून जोरदार प्रचार सुरु आहे. यामध्ये राष्ट्रवादीचे जयंत पाटील, अजित पवार, आदित्य ठाकरे यांनी तर चिंचवडमध्ये सभा देखील घेतल्या आहेत. तसेच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यात एक-दोन वेळा येऊन गेले आहेत. तसेच भाजप नेते आणि पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी तर कसबा जिंकून आणण्यासाठी कंबर कसली आहे.

अधिक वाचा  काँग्रेसच्या बड्या नेत्यावर गोळीबार, हल्लेखोरांकडून तब्बल १३ राउंड फायर; राजकारणात मोठी खळबळ

पाटील यांनी या निवडणुकीच्या दरम्यान जास्त वेळ कसब्यात देता यावा, जास्तीत जास्त लोकांना भेटता यावं, कार्यकर्त्यांना वेळ देता यावा, यासाठी त्यांनी कसबा पेठेतील सुभाषनगरमध्ये फ्लॅटच भाड्याने घेतला आहे. मात्र, येथे ते या निवडणुका होईपर्यंतच राहणार असून ते पुन्हा कोथरूडला जाणार आहेत. त्यामुळे सध्या तरी चंद्रकांत पाटील यांचा तात्पुरता मुक्काम कसब्यात असणार आहे.