“आता ट्वेंटी-ट्वेंटी मॅच सुरू केली असून आगामी निवडणुकीसाठी भाजपचा नवा संकल्प साकारण्यासाठी सर्वांनी कामाला लागा. पदं मिळतील, मिळणार नाहीत, पुढच्या निवडणुकीपर्यंत सर्व सोडा, सेवा करून लोकांचा विश्वास संपादन करा, त्यानंतर वर्षानुवर्ष जनता आपल्याला सत्तेमध्ये ठेवेल, त्यामुळे आता आपण बॅटिंग सुरू केलीय, 2024 ला आपणच मॅच जिंकणार असा निर्धार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. नाशिकमध्ये दोन दिवशीय भाजप कार्यकारिणीची बैठक पार पडली. आजच्या समारोपाप्रसंगी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी त्यांनी आगामी निवडणुकांसाठी भाजपचे मिशन 200 ची घोषणा केली. त्याचबरोबर महाविकास आघाडीवर जोरदार निशाणा साधला. दुसरीकडे आगामी निवडणुकासांठी भाजप कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी कामाला लागावं असं आवाहन त्यांनी केले. “समर्पण भावनेने सर्वांनी मैदानात उतरून काम करा. आपल्याला जनतेसाठी काम करायचं आहे. त्यामुळे अहंकार बाजूला ठेवा, आपल्याला काम करण्याची संधी मिळणार आहे, त्यामुळे आपलं समर्पण आपल्या पक्षासाठी मी मागतो आहे, असे आवाहन त्यांनी यावेळी भाजप कार्यकर्त्यांसह पदाधिकाऱ्यांना केले.
हे गद्दारांचे नव्हे तर खुद्दारांचे सरकार
देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी महाविकास आघाडीवर जोरदार निशाणा साधला. “आज जे महाराष्ट्रात सरकार आलंय, ते गद्दारांचं सरकार नसून खुद्दारांचं सरकार आहे. हिंदुत्वासाठी ज्यांची खुद्दारी आहे, ज्यांची विचारांसाठी खुद्दारी आहे असं हे सरकार आहे. गद्दारांना खाली पाडून आपल्या सोबत खुद्दार आले आणि आपण महाराष्ट्रात नवं सरकार उभं केलं. म्हणून खुद्दार आपल्या सोबत आहेत. शिवसेनेच्या उरलेसुरल्यांना थांबवण्यासाठी सर्व सुरू आहे. हे बेकायदेशीर आहे, ते बेकायदेशीर आहे, मी सांगतो आपण जे केलं आहे ते नियमात आहे, कायद्यात आहे. सर्वोच्च न्यायालयात आपल्या बाजूने निकाल येईल, हे मी ठासून सांगतो, असा विश्वास यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, “जर सर्वोच्च न्यायालयाने यांच्या बाजूने निकाल दिला तर सर्वोच्च न्यायालय उत्तम आणि जर यांच्या बाजूने निकाल दिला नाही तर दबावाखाली निकाल दिला असं म्हटलं जातं. देशातील सर्वोच्च संस्थांवर प्रश्न उपस्थित करण्याचे काम विरोधक करत आहेत. हे खरं म्हणजे विरोधकांचं फस्ट्रेशन आहे. आगामी निवडणुका त्यापेक्षा दीडपट जास्त जागा घेऊ, कारण जनता आपल्या सोबत आहे. शिंदे भाजप सरकारने केवळ सहा महिन्यांमध्ये शेतकऱ्यांना भरीव मदत दिली आहे. त्या सरकारने केवळ घोषणा केल्या. एक रुपयाही शेतकऱ्यांच्या खात्यावर दिला नाही.
“अडीच वर्षात तुम्ही जनतेसाठी काय केलं त्यातील एक तरी गोष्ट सांगा, शेतीसाठी घेतलेला निर्णय दाखवा, उद्योगासाठी घेतलेला एक निर्णय दाखवा, फक्त भ्रष्टाचार दिसून आला. तीन पायाचं ऑटो रिक्षा सरकार कधी गडगडेल, हे त्यांना ठाऊक होतं. महाराष्ट्राने यापूर्वी असा भ्रष्टाचार कधीच पाहिला नव्हता. भाजपच्या नेत्यांना तुरुंगात डांबण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. सगळे सरकार मला जेलमध्ये टाकण्याचा प्रयत्न करत होते. परंतु त्यांना जमलं नाही, ते जेलमध्ये गेले मी गेलो नाही. दुसरीकडे अडीच वर्षांमध्ये एकाही प्रकल्पाला मान्यता दिली नाही, आपलं सरकार आल्यानंतर पंधरा हजार कोटींच्या 24 प्रकल्पांना मान्यता दिली आहे, असं देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.