बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार पुन्हा एकदा भाजपसोबत जाणार का? असा प्रश्न उपस्थित होण्याचं कारण म्हणजे एका जेडीयू नेत्याने केलेलं विधान. जनदा दल (युनायटेड)च्या संसदीय बोर्डाचे अध्यक्ष उपेंद्र कुशवाहा यांनी यासंदर्भातलं विधान केलं आहे. ते म्हणाले की, ‘भाजपच्या नेत्यांना भेटल्यानंतर मी भाजपमध्ये जाणार असा अंदाज लावला जात आहे. परंतु आमच्या पक्षाचे मोठे नेते भाजप नेत्यांच्या संपर्कामध्ये आहेत.
उपेंद्र कुशवाहा पुढे म्हणाले की, भाजप नेत्यांच्या भेटीचे माझे फोटो पुढे आल्यानंतर मोठमोठी विधानं केली जात आहेत. याचा काय फायदा पण? कुणीही कुणासोबत वैयक्तिक संबंध ठेवू शकतो. माझा पक्ष हा जनता दल (युनायटेड) आहे. माझा पक्ष दोन-तीन वेळा भाजपच्या संपर्कात आला आणि पुन्हा बाहेर पडला. पक्ष आपल्या रणनितीनुसार चालतो. मी जेडीयूमध्ये असेन की नाही, हे मीच ठरवणार आहे.’ असं विधान कुशवाहा यांनी केल्यानंतर खळबळ उडाली आहे. भाजपच्या संपर्कात असलेला जेडीयूचा मोठा नेता कोण? नितीश कुमार भाजपच्या संपर्कात आहेत का? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतोय.
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार काही महिन्यांपूर्वीच भाजपपासून वेगळे झालेले आहेत. तरीही ते पुन्हा भाजपच्या संपर्कात असल्याचं बोललं जातं. जेडीयू आणि राष्ट्रीय जनता दल यांच्यामध्ये रामचरितमानस प्रकरणावरुन दुरावा झाल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे नितीश कुमार पुन्हा यू-टर्न घेतील, असं बोललं जातंय. याबाबत अधिकृतरित्या कुणीही बोललेलं नाही. मात्र कुशवाहा हे भाजपमध्ये जातील, अशी खात्री राजकीय जाणकार व्यक्त करीत आहेत.