पुणे : तेलंगणातील भाजपचे एकमेव आमदार राजासिंह यांनी पुण्यात एका कार्यक्रमात वादग्रस्त विधान केलं आहे. “जिहादींओं को चून, चून कर मारना है”, असं वादग्रस्त विधान तेलंगणाचे आमदार राजासिंह यांनी केलं आहे. “गोल टोपी वालों से व्होट की अपेक्षा मत करो”, असंही विधान राजासिंह यांनी केलं. पुण्यातील एका कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमस्थळी भाजप आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनीदेखील उपस्थिती लावलेली होती. शिवेंद्रराजे यांनीदेखील यावेळी भाषण केलं. “संभाजीराजे यांचे जन्मस्थळ हे पर्यटन क्षेत्र म्हणून नव्हे तर तीर्थक्षेत्र म्हणून घोषित करा. शिंदे-फडणवीस सरकारने लव्ह जिहाद, धर्मांतर विरोधी कायदा आणावा. सर्व धर्म, जातींनी एकत्र येण्याची गरज आहे. एकजूट होण्याची गरज आहे”, असं आमदार शिवेंद्रसिंहराजे म्हणाले.
दरम्यान, शिवेंद्रराजे यांच्या उपस्थितीमुळे राजासिंह ठाकूर भारावले होते. “छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आज कार्यक्रमाला उपस्थित आहेत ही भाग्याची गोष्ट आहे. मी महाराष्टात येतो तेव्हा महाराष्ट्रात मला हिंदुत्व पाहायला मिळते”, असं राजासिंह ठाकूर म्हणाले.
‘जय श्रीराम म्हटलं की तेलंगणा सरकार गुन्हा दाखल करतं’
तेलंगणा सरकारने मला अटक केली. त्यांना वाटलं राजासिंह तुटून जाणार, माझं बोलणं बंद होईल, असं तेलंगणा सरकारला वाटलं होतं”, असा दावा राजासिंह यांनी केला. जेलमधून बाहेर आल्यावर मी पहिला कार्यक्रम पुण्यात करतोय. मी जय श्रीराम म्हटलं की तेलंगणा सरकार माझ्यावर गुन्हा दाखल करतं, असा दावा राजासिंह यांनी केला.
“तेलंगणा सरकारने जिहादींची फौज उभी केली आहे. राजासिंह जर बाहेर राहिलेत तर आपल्याला अवघड जाणार असं तेलंगणा सरकारला वाटतंय”, असा आरोप राजासिंह यांनी केला. “एक-एक जिहादी को चून-चून कर मारना है”, असं विधान यावेळी राजासिंह यांनी केलं.
‘धर्मांतर करायला येईल त्याला 3 फूट गाढा’
“लव्ह जिहादच्या माध्यमातून मुलींना फसवलं जात आहे. धर्मांतर विरोधी कडक कायदा आणला पाहिजे. जो धर्मांतर करायला येईल त्याला 3 फूट जमिनीत गाढा”, असं विधान राजासिंह यांनी केलं.
“राज्य आणि केंद्र सरकारला विनंती आहे की देशात गोहत्या बंदी आणावी. मी आडज दगडूशेठ गणपती मंदिरात आरती केली. आता पुढच्यावेळी पुण्यातील पुण्यश्वर मंदिरात मी आरती करण्यासाठी येणार”, असं राजासिंह म्हणाले. “आम्हाला राज्य सरकारवर दबाव आणावा लागेल. पुण्यश्वरच्या नावाने पुण्याची ओळख आहे”, असंदेखील ते यावेळी म्हणाले.