पुणे – मागील काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात धक्कादायक घडामोडी घडत आहेत. त्यातच मध्यंतरी काँग्रेसनेते अशोक चव्हाण आणि माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे पुत्र अमित देशमुख भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. त्यामुळे कधी कोण भाजपमध्ये जाईल, याचा नेम नाही, अशी चर्चा सुरू होती. त्यातच पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदाराने विधानसभा निवडणूक विजयाचं श्रेय मंत्री आणि भाजपनेते सुधीर मुनगंटीवार यांना दिल्याने चर्चांना उधाण आलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे मावळमधील आमदार सुनील शेळके यांनी आपण सुधीर मुनगंटीवार यांनी दिलेल्या मंत्रामुळेच आमदार झाल्याचं विधान केलं. त्यांच्या या विधानमुळे मावळच्या राजकारणात उलथापालथ होणार अशी चर्चा सुरू झाली आहे. पवणानगर येथे आयोजित एका कार्यक्रमात आमदार शेळके आणि मुनगंटीवार एकत्र आले होते. यावेळी मुनगंटीवार यांनी देखील शेळके हे पूर्वाश्रमीचे भाजपचेच असल्याची आठवण करून दिली.

अधिक वाचा  उद्धव ठाकरेंनी दिल्लीत जाऊन मोदींची माफी मागितली, एकनाथ शिंदेंचा विधानपरिषेदत गौप्यस्फोट

आमदार शेळके आधी भाजपमध्येच होते. मात्र तिकीट नाकारल्यामुळे ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले होते. या कार्यक्रमात शेळके म्हणाले की, सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्याला, ‘कोशिश करने वालों की हार नही होती’, असा मंत्र दिला होता. मला आमदार व्हायचंच होतं. मुनगंटीवार यांच्या त्या मंत्रामुळेच मी आमदार झालो, असंही ते म्हणाले.

दुसरीकडे या कार्यक्रमाला भाजप नेते आणि माजी आमदार बाळा भेगडे यांची गैरहजेरी होती. त्यामुळे आगामी काळात आजी-माजी आमदारांमध्ये संघर्ष होणार हे स्पष्ट आहे. एकीकडे भाजपकडून भेडगे यांना ताकद दिली जात आहेत. त्याचवेळी शेळके यांनी केलेल्या विधानामुळे ते भाजपशी जुळवून घेण्याचा प्रयत्न तर नाही करत ना, असा प्रश्न उपस्थित होतोय.

अधिक वाचा  बदल्यांचा धडाका सुरुच! ‘या’ 6 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; नागपूर, संभाजीनगरचे कारभारी बदलले