चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस लढणार आहे. पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेसने एकमुखाने हा निर्णय घेतला आहे. आज शरद पवार, जयंत पाटील आणि अजित पवार यांच्यासमोर प्रस्ताव मांडण्यात येणार आहे. भाजपचा कोणताही उमेदवार असला तरी निवडणूक लढायची, असं स्थानिक राष्ट्रवादी काँग्रेसने ठरवल्याची माहिती शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी दिली आहे.
भाजपचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर रिक्त जागेवर पोटनिडवणूक होत आहे. येत्या 27 फेब्रुवारीला निवडणूक पार पडणार आहे. या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी रिंगणात उतरणार की निवडणूक बिनविरोध होणार? याच्या चर्चा सुरु असतानाच राष्ट्रवादीने निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केलं आहे. नाना काटे, भाऊसाहेब भोईर यांच्या नावाची चर्चा सुरु आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादी कोणाला रिंगणात उतरवणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. त्यांच्यासोबतच शिवसेनेचे राहुल कलाटे यांनी 2019 च्या विधानसभेच्या वेळी शिवसेनेतून बंडखोरी केली होती. त्यावेळी ते लक्ष्मण जगताप यांच्याविरोधात काही हजारांच्या मतांनी पराभूत झाले होते. या पोटनिवडणुकीच्या उमेदवारांच्या नावामध्ये त्यांच्या नावाचीही चर्चा आहे.
निवडणूक लढवण्याचा राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांचा निर्णय
लक्ष्मण जगताप हे भाजपात येण्यापूर्वी राष्ट्रवादीतच होते. त्यांचे आणि अजित पवारांचे चांगले कौटुंबिक संबंध आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी ही निवडणूक बिनविरोध होऊ देईल, असं बोललं जात होतं. जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना किंवा त्यांचे लहान बंधू शंकर जगताप या दोघांच्या नावाचीदेखील चर्चा आहे. अश्विनी जगताप यांना उमेदवारी दिली तर बिनविरोध होण्याची शक्यता होती. मात्र शंकर जगताप यांना उमेदवारी दिली तर सगळे पक्ष एकवटू शकतात अशाची चर्चा होत्या. मात्र राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी निवडणूक लढवणार असल्याचं सांगितलं आहे.
शंकर जगताप रिंगणात उरणार का?
चिंचवड विधानसभेची पोटनिवडणूक जाहीर होताच भाजपच्या कार्यकर्त्यांसह अनेक नागरिकांनी शंकर जगताप यांचा भावी आमदार म्हणून फोटो टाकण्यास सुरुवात केल्याने व्हॉट्सअॅप स्टेटस आणि रील्सही करण्यात आल्या. हे सर्व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप हे एकेकाळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि अजित पवार यांचे निकटवर्तीय मानले जात होते. प्रस्ताव मांडल्यावर राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते कोणती भूमिका घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.