गेल्याकाही दिवसांपासून कुस्तीपटूंच्या आंदोलनाने क्रीडाविश्वात खळबळ माजवली होती. पण काल रात्री उशिरा हे आंदोलन मागे घेण्यात आलं. रात्री उशिरापर्यंत केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर आणि कुस्तीपटूंमध्ये बैठक सुरु होती. या बैठकीत क्रीडा मंत्र्यांनी आश्वासन दिल्यानंतर कुस्तीपटूंनी आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला. यासोबतच कुस्तीपटूंनी केलेल्या आरोपांसदर्भात चौकशी करण्यासाठी एका समितीची स्थापना करण्यात आली आहे. ही समिती चार आठवड्यांतच आपला अहवाल सादर करणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, जोपर्यंत कुस्तीपटूंकडून करण्यात आलेल्या आरोपांची चौकशी पूर्ण होत नाही, तोपर्यंत कुस्ती संघटनेचं कामही हिच समिती पाहणार आहे. त्याचप्रमाणे, कुस्तीपटूंनी ज्यांच्यावर आरोपांची तोफ डागली आहे, ते कुस्तीगीर संघटनेचे विद्यमान अध्यक्ष बृजभूषण शरणसिंह तपास पूर्ण होईपर्यंत संघटनेच्या कामापासून दूर राहतील आणि समितीला तपासात पूर्णपणे सहकार्य करतील.
कुस्तीपटूंनी भारतीय कुस्ती महासंघाचे (WFI) अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात एल्गार पुकारत आंदोलन केलं होतं. त्यामुळे सर्वात आधी प्रशासनाकडून त्यांना अध्यक्षपदावरुन हटवण्यात आलं आहे. विनेश फोगट, बजरंग पुनिया, साक्षी मलिक आणि रवी दहिया यांच्यासह इतर कुस्तीपटूंनी केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांच्याशी झालेल्या चर्चेच्या दुसऱ्या फेरीत चौकशीचं आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, कुस्तीपटूंनी भारतीय कुस्ती महासंघ आणि त्याच्या अध्यक्षांवर लैंगिक छळ आणि भ्रष्टाचाराचे आरोप केले होते.
आज चौकशी समितीतील सदस्यांची घोषणा होणार
केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी कुस्तीपटूंसोबत केलेल्या मॅरेथॉन बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना सांगितलं की, “या प्रकरणाचा तपास करण्यासाठी एक देखरेख समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या समितीतील चौकशी अधिकाऱ्यांच्या नावांची घोषणा आज केली जाईल. तसेच, समिती चार आठवड्यांत तपास पूर्ण करेल. समिती WFI आणि तिच्या अध्यक्षांवरील आर्थिक किंवा लैंगिक छळाच्या सर्व आरोपांची गांभीर्याने चौकशी करेल.”
चौकशी होईपर्यंत बृजभूषण सिंह अध्यक्षपदापासून दूर
अनुराग ठाकूर पुढे बोलताना म्हणाले की, “समितीचा तपास पूर्ण होईपर्यंत, बृजभूषण सिंह अध्यक्षपदाच्या जबाबदारीपासून दूर राहतील आणि तपासात सहकार्य करतील. तसेच चौकशी पूर्ण होईपर्यंत WFI चे दैनंदिन काम समितीच पाहिल”
क्रीडामंत्र्यांनी आश्वासन दिल्याने आंदोलन मागे: बजरंग पुनिया
केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांच्यासोबत रात्री उशिरा झालेल्या मॅरेथॉन बैठकीनंतर कुस्तीपटू बजरंग पुनिया म्हणाले, “क्रीडामंत्र्यांनी आमच्या मागण्या ऐकल्या आणि योग्य तपासाचं आश्वासन दिलं. मी त्यांचे आभार मानतो आणि आम्हाला आशा आहे की, या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होईल, म्हणून आम्ही सध्या आंदोलन मागे घेत आहोत.”
भारतीय ऑलिम्पिक संघटनेनेही केली समितीची स्थापन
शुक्रवारी भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्यावरील लैंगिक शोषणाच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी भारतीय ऑलिम्पिक संघटनेने सात सदस्यीय समिती स्थापन केली होती. या समितीच्या सदस्यांमध्ये मेरी कोम, योगेश्वर दत्त, डोला बॅनर्जी, अलकनंदा अशोक, सहदेव यादव आणि दोन वकिलांचा समावेश करण्यात आला आहे.