मुंबई : विधान परिषदेच्या पाचही जागांसाठी महाविकास आघाडी एकत्रितपणे लढणार असे स्पष्ट करत आज आघाडीकडून उमेदवार निश्चित करण्यात आले. नाशिक मतदारसंघातील घटनांमुळे डॉ. सुधीर तांबे यांना पक्षाने आधीच निलंबित केले असून सत्यजित तांबे यांनाही प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या आदेशाने सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबित करण्यात आले आहे. यावर सत्यजीत तांबे यांची प्रतिक्रिया आली.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, ‘‘ विधान परिषद निवडणुकीवरून महाविकास आघाडीत समन्वय असून शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी एकत्रित चर्चा करून नाशिक व नागपूर मतदार संघाबाबत निर्णय घेतला आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघात डॉ. सुधीर तांबे यांना काँग्रेसची उमेदवारी दिली असतानाही त्यांनी पक्षाशी बेइमानी करत अर्ज दाखल केला नाही. त्यामुळे बदललेल्या राजकीय परिस्थितीत नाशिकमध्ये शिवसेनेच्या उमेदवाराला व नागपूरमध्ये काँग्रेस पुरस्कृत उमेदवार सुधाकर अडबाले यांना ‘मविआ’चा पाठिंबा आहे.
महागाई, बेरोजगारी हे मुद्देही महत्त्वाचे आहेत. नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाला उमेदवारही मिळाला नाही. भाजप हा दुसऱ्यांची घरे फोडणारा पक्ष असून पाठीमागून वार करणाऱ्या भाजपाला जनताच धडा शिकवेल अशी टीका पटोले यांनी केली. दरम्यान कारवाईनंतर सत्यजीत तांबे म्हणाले की, एवढे वर्षे पक्षासाठी काम केले त्यामुळे कारवाई करण्यापूर्वी पक्षाने आमची भूमिका जाणून घ्यायला हवी होती. आता आपण निवडणुकीच्या रिंगणात उतरलो असून अपक्ष म्हणून आपण लढणार आहोत, असही तांबे म्हणाले.