पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजपर्यंत राज्याच्या विकासासाठी एकही बैठक घेतली नाही. जर त्यांनी बैठक घेतल्याचं कुणी सिद्ध केलं तर मी हातात भाजपचा झेंडा घ्यायला तयार आहे, असं आव्हान राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर यांनी दिलं आहे. प्रशांत किशोर यांनी सध्या बिहारमध्ये स्वतंत्र राजकारण सुरु केलं आहे. बिहारमधल्या विद्यमान सरकारवर प्रशांत किशोर तुटून पडत आहेत. त्यातच आज त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला.

प्रशांत किशोर म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारच्या विकासासाठी एकही बैठक घेतली नाही. त्यांनी बैठक घेतल्याचं कुणी सांगावं, मी भाजपचा झेंडा हातात घ्यायला तयार आहे. ते एका सभेत बोलत होते. किशोर पुढे म्हणाले की, इथं उपस्थित असलेल्या अनेकांनी भाजपला मतं दिली असतील. आम्हीही २०१४ मध्ये भाजपसाठी काम केलं होतं. तेव्हा तर उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये कुणीही मोदींना ओळखतही नव्हतं. आम्ही मात्र त्यांच्यासाठी अभियान चालवलं. आता ९ वर्षांपासून ते देशाचे पंतप्रधान आहेत. परंतु बिहारसाठी त्यांनी काय केलं?

अधिक वाचा  अजितदादांनी सातारा दौऱ्यात मोठी खेळी साधली, माजी सहकार मंत्री स्व. विलासराव पाटील यांचे चिरंजीव गळाला?

‘मोदींनी बिहारसाठी ९ वर्षांमध्ये एकही बैठक घेतली नाही. बिहारने ३९-४० खासदार मोदींना जिंकून दिले. परंतु आमच्या विकासासाठी त्यांनी एकही बैठक घेतली नाही’ अशा शब्दांत प्रशांत किशोर यांनी मोदींना टार्गेट केलं. प्रशांत किशोर यांनी बिहारमध्ये ‘जन सुराज पदयात्रा’ काढली आहे. या यात्रेचे आता ११० दिवस पूर्ण झाले आहेत. बिहारच्या अनेक जिल्ह्यांमधून ही यात्रा पुढे सरकत आहे. या यात्रेमध्ये प्रशांत किशोर विकासाचे मुद्दे, मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर टीका आणि भाजपवरीह निशाणा साधत आहेत.