पुण्यातील सर्वाधिक लक्ष असलेला मतदारसंघ आणि पुण्याचे मध्यवर्ती असलेला कसबा मतदारसंघ कायमच चर्चेचा विषय ठरला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी भाजपच्या आमदार आणि पुणे शहराच्या माजी महापौर मुक्ता टिळक यांचं दीर्घ आजारानं निधन झालं. गेल्या काही महिन्यांपासून त्या कर्करोगाशी झुंज देत होत्या. त्यांच्या निधनानंतर पुन्हा एकदा कसबा मतदारसंघ चर्चेचा विषय ठरलं. राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली ठोंबरे पाटील यांनी कसबा मतदार संघातून आमदार होण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानंतर राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांनी या विषयावर सूचना देऊन पडदा टाकला. त्यानंतर आता पुन्हा एकदा हा विषय चर्चेत आला आहे कारण कसबा पेठीतील महत्वाच्या जागी म्हणजेच शनिवार वाड्याच्या जवळ एक पोस्टर लावण्यात आलं आहे.
या पोस्टरवर “कसबा झालाय भकास, आमदार हवाय झकास’ असं लिहून, शिवसेना फोडली, काँग्रेस-राष्ट्रवादी मधले उमेदवार पळवून नेले. पंढरपूर- कोल्हापुर मध्ये पोट निवडणुकीत उमेदवार उभे केले. अंधेरी पोट निवडणुकीत उमेदवारीच्या नोकरीचा राजीनामा नामंजुर करण्यापासुन ते NOTA पर्यंत गलिच्छ राजकारण केले. अश्या पक्षाला सहानुभूती का दाखवावी? म्हणुन, कसबा पोटनिवडणूक बिनविरोध होण्याला आम्हा कार्यकर्त्यांचा विरोध आहे असं त्या पोस्टरवर लिहण्यात आलं आहे. तर त्याच्या खाली ‘कसब्याच्या समस्यांना वैतागलेला एक सामान्य कार्यकर्ता’ असं लिहलं आहे.
आता पुन्हा एकदा या आमदारकीच्या पदासाठी चुरस दिसून येणार असल्याचे दिसून येत आहे. या जागेसाठी राष्ट्रवादीमधून रूपाली ठोंबरे पाटील उत्सुक आहेत. तर महाविकास आघाडी ही जागा भाजपसाठी सोडून देणार की, आपला उमेदवार उभा करणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. पोटनिवडणूक बिनविरोध होऊ नये म्हणून हा पोस्टर लावण्यात आला आहे.