६५ वी ‘महाराष्ट्र केसरी’ ही मानाची कुस्ती स्पर्धा पुण्यात रंगतेय. सातारा येथे झालेल्या गत स्पर्धेत कोल्हापुरचा आंतरराष्ट्रीय मल्ल पृथ्वीराज पाटीलने महाराष्ट्र केसरीची गदा खांद्यावर घेतली होती. पुण्यातील महाराष्ट्र केसरी स्पर्धा ही रंजक असून विविध विभागातून अनेक तुल्यबळ मल्ल महाराष्ट्र केसरी साठी आपले नशीब आजमावत असल्याने यंदाच्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेला एक वेगळे महत्त्व निर्माण झाले आहे. महाराष्ट्र केसरी चे दावेदार नागपूर मुंबई पुणे या विविध विभागातून सहभागी झाल्याने महाराष्ट्र केसरीच्या सर्वच लढती त तुल्यबळ होण्याची शक्यता असून अंतिम सामना हा कुस्ती शौकिकांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारा असणारं आहे. महाराष्ट्र केसरी लढतीला शुभारंभ झाल्यानंतर माऊली जमदाडे व सिकंदर शेख एकच तालमीतील मल्लांच्या लढतीने उपस्थित शौकिनांच्या नजरा भिडल्या. त्यानंतर नागपूर जिल्हाचे प्रतिनिधित्व करणारा बारामतीचा मल्ल भारत मदने याच्या लढतीने विजयी सलामी मिळाली. त्यानंतर नुकतीच अभिजित कटके यांच्यासह हिंद केसरी खेळलेला तानाजी (मुन्ना) झुंजुरके यानेही मुंबईकडून विजयी सलामी स्पर्धेत दिली आहे. सातारा येथे महाराष्ट्र केसरी गदेचा कोल्हापुरचा २१ वर्षांचा दुष्काळ पृथ्वीराजने संपवला होता.
यंदा कुणाला कुणाचे आव्हान?
गत स्पर्धेत धक्कादायक निकाल लावणार पुण्याचा युवा मल्ल हर्षद ऊर्फ माऊली कोकाटे यंदा देखील चांगल्या तयारीने स्पर्धेत उतरला आहे. पृथ्वीराज आणि माऊलीचा खेळ तोडीस तोड असल्याने पृथ्वीराज समोर माऊलीचे मोठे आव्हान असेल. तसेच जागतिक पदक विजेता सोलापूरचा महेंद्र गायकवाड, पुणे शहराचा पृथ्वीराज मोहोळ, २०१८ चा महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर, सिकंदर शेख, किरण भगत, माऊली जमदाडे, नुकतीच अभिजित कटके यांच्यासह हिंद केसरी खेळलेला तानाजी(मुन्ना) झुंजुरके अशा वरिष्ठ मल्लांचा सामना रंगणार आहे. पृथ्वीराज पाटीलशी संवाद साधला असता तो सांगतो, ट्रिपल महाराष्ट्र केसरीसह माझे ऑलिम्पिकचे स्वप्न आहे. माझी तयारी चांगली आहे. प्रतिस्पर्धी मल्लांच्या खेळाचा अभ्यास करुन मी यंदा लढण्याचे तंत्र आत्मसात केले आहे. गत तीन वर्षाच्या अनुभवाच्या जोरावर मी परत एकदा जिंकेन.
पै.पृथ्वीराज पाटीलची बलस्थाने…
पृथ्वीराज हा सामना प्लेअर म्हणुन ओळखला जातो. मॅटवर तांत्रिकदृष्टया लढण्याचे कौशल्य त्याने अंगीकारले आहे. या तंत्राच्या जोरावर त्याने सिनिअर नॅशनल तसेच जागतिक स्पर्धेत पदकांची कमाई केली आहे. बॅक थ्रो, दुहेरी पट काढने, भारंदाज मारने असे त्याचे हुकमी डाव आहेत.
यंदा देखील मोठ्या ताकदीने तो स्पर्धेत उतरला आहे. ३ वर्षापुर्वी तो जागतिक विजेता देखील ठरलाय. तसेच नुकतेच सिनिअर नॅशनल व सर्विस गेम मध्ये त्याने सुवर्ण कामगिरी केली आहे. गतस्पर्धेत अंतिम लढतीत सोलापूरचा मल्ल विशाल बनकर ला पृथ्वीराजने पराभूत केले होते. यंदा देखिल पृथ्वीराज कोल्हापुरला महाराष्ट्र केसरीचा दुहेरी मान मिळवून देणार का? याकडे कुस्ती शौकिनांच्या नजरा लागल्या आहेत. कोणती घाई न करता प्रतिस्पर्धी मल्लाचा अंदाज घेत तो खेळी करतो. मॅट वर आपला पवित्रा भक्कम ठेवत तो लढतो. सुरवातीला बचावात्मक आणि समोरच्या मल्लाचा अंदाज घेत तो आक्रमक होतो. शांत, संयमाने खेळ करत तो डावबाजी करतो व प्रतिस्पर्धी मल्लाच्या डावबाजीची तोड लगेच करत स्वतःचा बचाव करत गुण हासिल करण्यात त्याचा हातखंडा आहे.