रॅपिडो कंपनीचा परवाना रद्द करण्यासाठी महाराष्ट्र रिक्षा पंचायत, ऑटो रिक्षा टॅक्सी राष्ट्रीय फेडरेशनच्या वतीने सातत्याने आंदोलन, मोर्चे काढण्यात आले होते. या आंदोलनाला यश आले आहे. आरटीओ कार्यालयाने नुकतेच प्रसिद्धीपत्रक प्रसिद्ध केले आहे. त्यामध्ये रॅपिडो कंपनीचे ऍग्रीगेटर लायन्सन रद्द करण्यात आल्याची माहिती दिली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून संघटनेच्या माध्यमातून दिलेल्या लढ्याला यश आले असल्याची माहिती पुणे रिक्षा फेडरेशनचे अध्यक्ष व ऑटो रिक्षा संयुक्त कृती समितीचे नेते आनंद तांबे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली. कर्वेनगर वारजे येथील आनंद तांबे यांच्या निवासस्थानी देशातील सर्वप्रथम ही बैठक घेण्यात आली या बैठकीमध्ये राष्ट्रीय अध्यक्ष बाबा कांबळे कार्याध्यक्ष राजेंद्र सोनी (दिल्ली) जावेद शेख (जम्मू काश्मीर) नरेंद्र गायकवाड (नांदेड), आनंद जवरे (नागपूर) सह देशभरातील प्रतिनिधी उपस्थित होते.
राष्ट्रीय ऑटो रिक्षा टॅक्सी बस ट्रान्सपोर्ट फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष व आटो रिक्षा टॅक्सी चालक-मालक संघटना संयुक्त कृती समिती महाराष्ट्र राज्य अध्यक्ष बाबा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली पुणे पिंपरी चिंचवड महाराष्ट्रभर आंदोलन करण्यात आले याची दखल घेण्यात आली असून मोबाईल ॲपलिकेशन मधून टू व्हीलर सेक्शन काढले पाहिजे यासाठी मुंबई व दिल्ली येथे आंदोलन करण्यात येणार आहे, याबाबत महाराष्ट्र व देशभरामध्ये बैठका सुरू असून आंदोलन करण्याबद्दल देशातील सर्व संघटनांचे एकमत झाले आहे, लवकरच देशाची राजधानी दिल्ली व मुंबई येथे देखील आंदोलन करणार आहे असे आनंद तांबे म्हणाले.
आनंद तांबे म्हणाले की, ओला उबेर, रॅपिडो बाईक यामुळे रिक्षा चालकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. विनापरवाना खासगी कंपन्यांनी प्रवासी वाहतूक सुरू केली आहे. त्यांच्यावर कारवाई करण्याकडे राज्य सरकार, प्रशासन देखील दुर्लक्ष करत होते. त्याविरोधात संघटनेच्या वतीने आवाज उठविण्यात आला होता. महाराष्ट्र रिक्षा पंचायतचे वतीने १९ डिसेंबर रोजी पुणे विधान भवन येथे व महाराष्ट्रातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालय व देशातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले होते. त्यामुळे आंदोलनाचा राज्यात व देशात चांगला परिणाम दिसून येत आहे.
रॅपिडो कंपनीने एग्रीकेटर म्हणून आम्हाला परवाना द्यावा असा अर्ज केला होता. तो अर्ज फेटाळला असल्याची माहिती आरटीओने दिली आहे. हे आंदोलनाचे यश आहे. पूर्वी देखील महाराष्ट्र रिक्षा पंचायत व पुणे रिक्षा फेडरेशनच्या वतीने रॅपिडो, ओला बद्दल गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती, ते देखील मान्य करून पुणे व पिंपरी चिंचवड आरटीओच्या वतीने रॅपिडो वरती गुन्हा दाखल केला आहे.
महाराष्ट्र रिक्षा पंचायत व इतर संघटनेच्या आंदोलनाची दखल घेत पुणे आरटीओच्या वतीने बंड गार्डन पोलीस स्टेशनमध्ये, तर पिंपरी चिंचवड आरटीओने एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये रॅपिडो कंपनी वरती गुन्हा दाखल केला आहे. रॅपिडो टू व्हीलर टॅक्सी बेकादेशीर म्हणून घोषित करावे अशी मागणी देखील आम्ही केली होती. याच आधारे प्रवाशांची वाहतूक बेकायदेशीर असल्याचे प्रशासनाने जाहीर केले आहे. हे संघटनेचे यश आहे. जोपर्यंत ऑनलाइन रापिडो ॲप डिलीट होत नाही तोपर्यंत आंदोलन करत राहू, असे आनंद तांबे म्हणाले