मी दिलेला शब्द पाळतो म्हणून 50 लोकांनी म्हणजेच आमदारांनी माझ्यावर विश्वास ठेवला. त्यामुळे मी मुख्यमंत्री झालो, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. जळगावातील पाचोरा तालुक्यातील लोहारी येथे अखिल भारतीय बडगुजर समाजाचा महाअधिवेशन पार पडलं. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कार्यक्रमात जोरदार फटकेबाजी केली.

मी दिलेला शब्द पाळतो म्हणून लोकांनी विश्वास ठेवला

या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येथील का येणार नाही अशी चर्चा होती? मात्र ते या छोट्याशा कार्यक्रमासाठी ही उपस्थित राहिले, असे मान्यवरांनी मनोगतात बोलताना सांगितलं. त्यावर मनोगतात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक बार जो मैने कमिटमेंट कर दी, तो मैं खुद की भी नहीं सुनता असं म्हटलं. या डायलॉगवर सर्वांनी टाळ्या वाजवून प्रतिसाद दिला. शिंदे म्हणाले की, समाज छोटा आहे असं काही नाही, आपण मनाने मोठे आहात. मी दिलेला शब्द पाळतो म्हणून लोकांनी विश्वास ठेवला, असं मुख्यमंत्री म्हणाले. मी माझ्या राजकीय जीवनात दिलेला शब्द पडू देत नाही, ही माझी काम करण्याची पद्धत आहे, असंही ते म्हणाले.

अधिक वाचा  सामाजिक कार्यकर्ता प्रशिक्षण वर्गाच्या सांगता समारंभ व प्रमाणपत्र वितरण सोहळा मोठया उत्साहात संपन्न

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी शिंदे व भाजप सरकारमधील नेत्यांच्या डोक्यात सत्याची हवा गेली असल्याची टीका केली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कार्यक्रमानंतर बोलताना म्हटलं की, शरद पवार हे मोठे नेते आहेत. मात्र आम्ही कालही कार्यकर्ते म्हणून काम करत होतो. आजही कार्यकर्ते म्हणून काम करत आहोत. महाराष्ट्राचे जनतेचे सेवक म्हणून आम्ही काम करत आहोत, असे म्हणत मुख्यमंत्री शिंदे यांनी शरद पवार यांना उत्तर दिलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बडगुजर समाजाच्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक तसेच विविध मागण्यांसाठी आम्ही सकारात्मक भूमिका घेऊन केंद्र सरकारकडे विनंती करू आणि सरकार म्हणून ते सोडविण्याचा प्रयत्न राहील, असे आश्वासन दिले.

अधिक वाचा  आजची स्त्री निर्भयपणे व आत्मविश्वासाने जगते ही बाबासाहेबांची देणं आहे – प्राचार्या यशोधरा वराळे

ताफा अडवून मराठा समाजाने निवेदन दिले

पाचोऱ्यात एकनाथ शिंदे यांचा ताफा अडवून मराठा क्रांती मोर्चा व मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेडने विविध मागण्यांसंदर्भात निवेदन दिले. मराठा समाजाबद्दल अपशब्द वापरणाऱ्या पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना बडतर्फ करुन तात्काळ अटक करावी, तसेच सहा महिने झाले शिंदे – फडणवीस सरकारने मराठा आरक्षणवर मौन आहे. हे मौन तोडून मराठा समाजाला आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी संघटनेनं केली.