राज्यात जिल्हा परिषदेच्या चार हजार ७८९ शाळांची पटसंख्या १५ ते १८ एवढीच आहे. ज्या शाळांचा पट वाढलेलाच नाही, अशा साडेतीन हजार शाळांवरील सध्याचे कार्यरत शिक्षक दुसऱ्या शाळेत हलवले जाणार आहेत. त्या कमी पटाच्या शाळांवर आता कंत्राटी व सेवानिवृत्त शिक्षक चांगल्या मानधनावर नेमले जाणार आहेत. त्यासंबंधीची माहिती शिक्षण संचालक कार्यालयातील विश्वसनिय सूत्रांनी दिली. राज्यात जिल्हा परिषदेच्या ६० हजार ९१२ शाळा असून त्याअंतर्गत जवळपास ४४ लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यात वस्ती शाळा, कमी पटसंख्येच्या शाळांचा देखील समावेश आहे. मागील सहा-सात वर्षांपासून पटसंख्या कमी असूनही काही शाळा तशाच सुरु असून त्याठिकाणी विद्यार्थी संख्येच्या तुलनेत शिक्षकांची मंजूर व कार्यरत पदे जास्त आहेत. अनेक शाळांमध्ये विद्यार्थी अधिक असतानाही तेथे शिक्षक कमी पडू लागल्याची वस्तुस्थिती आहे. आता दळणवळणाची साधने वाढली असून विद्यार्थ्यांचा ओढा इंग्रजी माध्यमांकडे वाढलेला आहे. अशा परिस्थितीत कमी पटसंख्या असलेल्या शाळांमधील विद्यार्थी वाढत नसल्याची वस्तुस्थिती आहे. काही शाळांमध्ये पहिली ते सातवीपर्यंतच्या वर्गातील पटसंख्या १४ असून त्याठिकाणी तीन शिक्षक आहेत. ही परिस्थिती आता बदलण्यात येणार असून ज्या शाळांची पटसंख्या अनेक वर्षांपासून वाढलेलीच नाही किंवा कमी झालेली आहे, अशा शाळांमधील विद्यार्थी जवळील शाळेत पाठविली जातील, असेही सूत्रांनी सांगितले.

अधिक वाचा  ‘भाजपला ५ राज्यांत यश पण, हिंमत असेल तर…’, महाराष्ट्रात या निवडणुका घ्या ठाकरेंचं थेट आव्हान

झेडपी शाळांची सद्यस्थिती

एकूण शाळा               ६०,९१२

विद्यार्थी संख्या            ४३.५६ लाख

कमी पटाच्या शाळा       ४,७९०

टीईटी’ उत्तीर्ण उमेदवारांना प्राधान्य

कमी पटसंख्या असलेल्या ज्या शाळा बंद करून चालणार नाही, अशा शाळा सुरुच ठेवल्या जाणार आहे. पण, शाळांमधील पटसंख्या दिवसेंदिवस कमीच होत गेली, पण तेथे शासनाचे वेतन घेणारे दोन-चार शिक्षक कार्यरत आहेत, अशा शाळांवरील शिक्षक आता झेडपीच्या दुसऱ्या शाळेत पाठवले जातील. त्या शाळांवर ‘टीईटी’ उत्तीर्ण उमेदवारांना मानधनावर शिकवण्याची संधी दिली जाणार आहे. तसेच काही सेवानिवृत्त शिक्षकांनाही चांगले मानधन देऊन तेथे नियुक्त केले जाईल, असे नियोजन असल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली.