विजय हजारे ट्रॉफीत बंगळुरू येथील सामन्यात तमिळनाडूच्या संघाने धावा करण्याचा कहरच केला. तमिळनाडूने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात फक्त 2 विकेट्स गमावून तब्बल 506 धावा ठोकल्या. लिस्ट A च्या वनडे सामन्यात इतकी मोठी धावसंख्या इतिहासात पहिल्यांदाच उभारली गेली. तमिळनाडूकडून नारायण जगदीशनने अरूणाचल प्रदेशच्या गोलंदाजांची तुफान धुलाई केली. त्याने 277 धावांची द्विशतकी खेळी करत संघाच्या जवळपास निम्म्या पेक्षा जास्त धावा एकट्यानेच कुटल्या. त्याने आपल्या खेळीत 25 चौकार आणि 15 षटकार मारले.

तमिळनाडूने लिस्ट A च्या सामन्यात इतिहास रचण्यापूर्वी इंग्लंडने वनडे सामन्यात नेदलँडविरूद्ध 498 धावा ठोकल्या होत्या. आता हे रेकॉर्ड तमिळनाडूने आपल्या नावावर केले आहे. तमिळनाडूच्या जगदीशन सोबतच साई सुदर्शन याने देखील दमदार फलंदाजी करत 38.3 षटकात 416 धावांची सलामी दिली. ही ऐतिहासिक कामगिरी देखील लिस्ट A सामन्यातील सर्वात मोठी सलामी भागीदारी ठरली. साई सुदर्शनने 102 चेंडूत 154 धावांची धडाकेबाज खेळी केली. त्यात 19 चौकार आणि 2 षटकार मारले.

अधिक वाचा  “अमृता वहिनी शांत कशा बसल्या?; कानाखाली द्यायला पाहिजे होती” : संजय राऊत

जगदीशनने याच सामन्यात श्रीलंकेचे महान सलामीवीर कुमार संगकाराला देखील मागे टाकले. त्याने लिस्ट A क्रिकेटमध्ये सर्वाधिक सलग शतके ठोकण्याचा विक्रम आपल्या नावावर केला. लिस्ट A मध्ये वेगवेगळ्या देशातील देशांतर्गत वनडे स्पर्धा ज्यात 40 ते 60 संघांनी भाग घेतलेला असतो अशा स्पर्धांचा समावेश असतो.

दरम्यान, बाबा इंद्रजीतच्या नेतृत्वातील तमिळनाडूच्या अवाढव्य 506 धावांचा मुकाबला करण्यासाठी मैदानात उतरलेल्या अरूणाचल प्रदेशने 71 धावातच नांग्या टाकल्या. तमिळनाडूने 28 षटकात अरूणाचल प्रदेशचा संपूर्ण संघ 71 धावात पॅव्हेलियनमध्ये धाडला. तामिळनाडूकडून मनिमरन सिद्धार्थने 12 धावात निम्मा संघ गारद केला. सिलामबरसन आणि मोहम्मदने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. अरूणाचल प्रदेशकडून कर्णधार कामशा यांगफोने सर्वाधिक 17 धावा केल्या. अरूणाचलच्या फक्त 3 फलंदाजांना दुहेरी आकडा गाठता आला. चार फलंदजांना तर भोपळाही फोडता आला नाही.