मुंबई : सध्या गाजत असलेल्या श्रद्धा वालकर प्रकरणातील आफताब आणि श्रद्धा लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहात होते. या नात्याचे जे काही परिणाम सध्या पाहायला मिळत आहेत त्यावरून लिव्ह इन रिलेशनशीपबाबत नकारात्मक प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. अशा वेळी लिव्ह इन रिलेशनशीपला आजही पुरेशी समाजमान्यता का नाही? या नात्यात सुरक्षितता किती असते? महिलेला कायदेशीर संरक्षण मिळतं का? हे जाणून घेऊ या…

लिव्ह इन रिलेशनशीप म्हणजे काय ?

लिव्ह इन रिलेशनशीप म्हणजे लग्नाशिवाय स्त्री-पुरुषांनी एकत्र राहाणे. यात कायदेशीर आणि धार्मिक पद्धतीने लग्न झालेले नसते; मात्र तरीही हे जोडपे पती-पत्नीप्रमाणे आयुष्य जगत असते. यात भावनिक संबंध असतातच; पण काही वेळा लैंगिक संबंधही प्रस्थापित केले जातात.

अधिक वाचा  रितेश देशमुख यांच्या कंपनीच्या चौकशीचे सहकार मंत्र्यांनी दिले आदेश

या नात्याची कायदेशीर स्थिती काय असते ?

विवाह करणाऱ्या जोडप्यांसाठी कायद्यात स्वतंत्रपणे तरतूद करण्यात आली आहे. विवाहाची कायदेशीररित्या नोंद होते तसेच घटस्फोट घेतानाही कायदेशीर प्रक्रिया पार पाडावी लागते. कायदेशीर विवाह करणाऱ्या जोडप्यांसाठी पोटगी, वारसाहक्क याबाबत कायदे आहेत. त्यामुळे विवाह सुरक्षित असतो आणि त्याला समाजमान्यताही मिळते. याउलट लिव्ह इन रिलेशनशीपसाठी कोणताही स्वतंत्र कायदा नाही. या नात्यातून सुटका करून घेणे तुलनेने सोपे असते. यात लैंगिक संबंध आले असल्यास त्यातून उद्भवणाऱ्या परिणामांची आणि जन्माला आलेल्या मुलाची जबाबदारी हा अनेकदा चिंतेचा विषय बनतो.

काही वेळा अशा नात्यातील पुरूष मुलाची जबाबदारी स्वीकारतात; मात्र जेव्हा ते तसं करत नाहीत तेव्हा महिलांची आणि मुलांची फरफट होते. लिव्ह इन रिलेशनशीपच्या काही प्रकरणांमध्ये न्यायालयाने महिलांना संरक्षण दिल्याचीही उदाहरणे आहेत.

अधिक वाचा  माझाही कुंडलीचा अभ्यास; अघोरी विद्येच्या मागे असणाऱ्यांचा अंतही अघोरीच होतो; संजय राऊत

विवाहससदृश्य म्हणजेच लिव्ह इन रिलेशनशीपसारख्या नातेसंबंधांबाबत काही निकष कायद्याने स्पष्ट केले आहेत. या संबंधातील स्त्री आणि पुरुष हे विवाह करण्यास कायद्याने सक्षम हवेत. तसेच त्यांनी लग्न करणे कायद्याने शक्य असूनही त्या व्यक्तींनी स्वतःहून लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहण्याचा निर्णय घेतलेला असावा, असे ते निकष आहेत.

याचा अर्थ, एक विवाह अस्तित्त्वात असताना दुसऱ्या व्यक्तीबरोबर राहणे हे कायद्यात बसत नाही. त्यामुळे अशा व्यक्तींना कायद्याचे संरक्षण नाही.

इतर निकष

या नातेसंबंधात प्रदीर्घ काळ एकत्र राहणे आवश्यक आहे. काही दिवस एकत्र राहण्याला नातेसंबंध म्हणता येणार नाही.

अधिक वाचा  ‘देवेंद्रजी, मनाची तरी लाज बाळगा’; उद्धव ठाकरे यांचा फडणवीस यांच्यावर जोरदार हल्ला

या विवाहससदृश्य नात्यांमधील संबंध सामाजिक आणि कौटुंबिकदृष्ट्या पती पत्नीसारखेच असावेत.

या नात्यातून जन्माला येणाऱ्या अपत्यावर अन्याय होऊ नये, यादृष्टीनेच सुप्रीम कोर्टाने लिव्ह इन रिलेशनशीप हे अनैतिक असले तरी बेकायदेशीर नाहीत असे म्हटलं आहे.

पण कोर्टाने या नात्याचा उल्लेख ‘लिव्ह इन रिलेशनशीप’ न करता विवाहससदृश्य संबंध असाच केला आहे.