ठाणे : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत अनैसर्गिक युती केल्यानेच आम्ही बंडाचा निर्णय घेतला, असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून केला जातो. मात्र काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी नुकताच एक नवा गौप्यस्फोट करत शिंदे यांच्या दाव्यातील हवा काढून घेण्याचा प्रयत्न केला. खरंतर २०१४ सालीच काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत युती करण्यासाठी शिवसेनेचं एक शिष्टमंडळ आमच्याकडे आलं होतं आणि एकनाथ शिंदे हे स्वत: त्या शिष्टमंडळात सहभागी होते, असं म्हणत चव्हाण यांनी खळबळ उडवून दिली. अशोक चव्हाण यांच्या या वक्तव्याची राज्यभरात मोठी चर्चा होत असताना शिंदे गटाकडून पहिला पलटवार करण्यात आला आहे.

अधिक वाचा  कौतुकास्पद! विधवा वहिनीशी दिरानं बांधली लग्नगाठ; सर्व स्तरातून तरुणाचं कौतुक

शिंदे गटाचे ठाणे जिल्हाप्रमुख आणि प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी केलेल्या विधानाचा खरपूस समाचार घेतला आहे. ज्या चव्हाणांनी संपूर्ण महाराष्ट्रासमोर ‘आदर्श’ घालून दिला त्यांनी केलेल्या वक्तव्याला महत्व देत नसल्याचं मत म्हस्के यांनी व्यक्त केले आहे. त्यासोबतच ज्यांच्या स्वतःबद्दल गेल्या काही दिवसात ते नाराज असून इकडे तिकडे जाणार आशा बातम्या येत आहेत, जे स्वतः विधान परिषदेच्या निवडणुकीला गैरहजर राहिले ते आता माध्यमांचे लक्ष वेधून घेण्यासाठी माननीय एकनाथ शिंदे यांच्यावर आरोप करत असून त्याला फार महत्व देण्याची गरज नसल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं आहे.

अधिक वाचा  मोदींचा ३.५ तासात ५० km ‘रोड शो’; सर्वात मोठा भारतीय राजकारणाच्या इतिहासातला ‘रोड-शो’

शंभूराज देसाईंनीही घेतला समाचार

अशोक चव्हाण यांच्या दाव्याने अडचणीत आलेल्या शिंदे गटातील विविध नेत्यांकडून चव्हाण यांना प्रत्युत्तर दिलं जात आहे. शिवसेनेचे बंडखोर नेते आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री शंभूराज देसाई यांनी म्हटलं आहे की, ‘अशोक चव्हाणांना ६ महिने लागले का हे बोलायला? आम्ही आता भूमिका घेतली तेव्हा त्यांना सुचलं का? काय तरी बोलायचं आणि दिशा वळवायची असा हा प्रयत्न आहे.’

नेमकं काय म्हणाले होते अशोक चव्हाण?

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना आणि भाजपची युती तुटली, शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत महाविकास आघाडी करत सत्ता स्थापन केली. पण सत्ता स्थापनेसाठी २०१४ मध्येच शिवसेनेकडून काँग्रेसकडे प्रस्ताव आला होता. विशेष म्हणजे त्यावेळी शिवसेनेच्या शिष्टमंडळात एकनाथ शिंदेही होते आणि प्रस्तावाबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा करण्यास मी त्यावेळी सुचवलं होतं. त्यांची संमती असेल तर आमच्या पक्षातर्फे तुमच्या प्रस्तावाचा विचार करू, असं माझ्याकडून सांगण्यात आल्याचं अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे.