मुंबई : माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण सध्या चर्चेत आहेत. आता अशोक चव्हाण यांनी शिवसेना आणि एखनाथ शिंदेंबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. २०१४ मध्ये शिवसेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत येण्याची तयारी दर्शवली होती, असा गौप्यस्फोट अशोक चव्हाण यांनी केला आहे. शिवसेनेतील एकनाथ शिंदेंच्या बंडाच्या पार्श्वभूमीवर अशोक चव्हाण बोलले.

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेना आणि भाजपची युती तुटली, शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत महाविकास आघाडी करत सत्ता स्थापन केली. पण सत्ता स्थापनेसाठी २०१४ मध्येच शिवसेनेकडून काँग्रेसकडे प्रस्ताव आला होता. विशेष म्हणजे त्यावेळी शिवसेनेच्या शिष्टमंडळात एकनाथ शिंदेही होते. आणि प्रस्तावाबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा करण्यास त्यावेळी सुचवलं होतं. त्यांची संमती असेल तर आमच्या पक्षातर्फे तुमच्या प्रस्तावाचा विचार करू, असं अशोक चव्हाण म्हणाले. त्यावेळी अशोक चव्हाणांच्या चर्चगेट येथील कार्यालयात शिवसेनेचं शिष्टमंडळ भेटलं होतं. २०१५ आणि २०१९ भाजप युतीचे सरकार होते. नंतरच्या काळात भाजप शिवसेनेत कुरबुरी होत्या. आणि त्यांनी युती असतानाही शिवसेना आणि भाजपने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढवल्या होत्या. या पार्श्वभूमीवर अशोक चव्हाण यांनी दावा केला आहे.

अधिक वाचा  गुवाहाटी विमानतळावर एकनाथ शिंदे विरोधकांवर कडाडले; म्हणाले, कामाख्या देवी जागृत..

अशोक चव्हाणांनी केलेल्या गौप्यस्फोटामुळे एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडावर शंका निर्माण केली जात आहे. कारण शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत गेल्याने आपण शिवसेनेतून बाहेर पडलो. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या विचारांशी प्रतारणा केल्याचा आरोप शिंदेंकडून करण्यात येतो. यामुळे शिवसेनेतून बाहेर पडण्याच्या एकनाथ शिंदे यांच्या कारणात तथ्य आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जातोय. अशोक चव्हाणांच्या या वक्तव्यावर आता शिंदे गटातील मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अशोक चव्हाण यांच्या बोलण्यात काहीच अर्थ नाही. एकनाथ शिंदे गेलेही असतील. पण पक्षाचे नेते सांगतात तेव्हा जावं लागतं. आणि शिवसेनेसोबत जा, असं सोनिया गांधींनी अशोक चव्हाणांना सांगितल्यावर त्यांनाही जावं लागलं, असं सांगत मंत्री गुलाबराव पाटील यांनी चव्हाणांचा दावा खोडून काढला.