नवी दिल्ली : २८ सप्टेंबरपासून म्हणजेच बुधवारपासून सुरु होणाऱ्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या T20 मालिकेपूर्वी भारतीय संघात मोठे बदल करण्यात आले आहेत. हार्दिक पांड्या आणि दीपक हुडाच्या जागी डावखुरा फिरकीपटू शाहबाज अहमद आणि फलंदाज श्रेयस अय्यर यांचा संघात समावेश करण्यात आला आहे. मोहम्मद शमीही आतापर्यंत करोनामधून बरा न झाल्याने मालिकेतून बाहेर गेला आहे. अष्टपैलू दीपक हुडाच्या पाठीत दुखापत झाल्याचे सांगितलं जात आहे.

बीसीसीआयच्या एका वरिष्ठ सूत्राने सांगितलं की, ‘शमी करोनातून सावरलेला नाही, त्याला आणखी वेळ हवा आहे आणि त्यामुळे तो दक्षिण आफ्रिका मालिकेतून बाहेर आहे. या मालिकेत शमीच्या जागी उमेश यादव संघात खेळणार आहे. मात्र, पंड्यापेक्षा शाहबाजची निवड का करण्यात आली, असे विचारले असता, सूत्राने सांगितले की, ‘हार्दिकची जागा घेऊ शकेल असा कोणी वेगवान अष्टपैलू खेळाडू आहे का? राज बावा खूप कच्चा आहे आणि म्हणून आम्ही त्याला भारत अ संघात एक्सपोजरसाठी ठेवलं आहे, त्याच्याकडे तयारीसाठी वेळ आहे. दुसरे नाव सांगा?’ दरम्यान, सौराष्ट्र विरुद्धच्या इराणी चषकात हनुमा विहारी भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे.

अधिक वाचा  राज ठाकरे यांची तब्बल 6 महिन्यांनी आज सभा,जाहीर भाषण

ऑस्ट्रेलियाला पराभूत केल्यानंतर आता भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन टी-२० सामने खेळून विश्वचषकाची तयारी पूर्ण करणार आहे. या मालिकेतील सामने त्रिवेंद्रम (२८ सप्टेंबर), गुवाहाटी (१ ऑक्टोबर) आणि इंदोर (३ ऑक्टोबर) येथे होणार आहेत. T20 मालिकेनंतर एकदिवसीय सामनेही तेवढेच होणार आहेत. पहिला सामना रांचीमध्ये (६ ऑक्टोबर), दुसरा सामना लखनऊमध्ये (९ ऑक्टोबर) आणि तिसरा सामना दिल्लीत (११ ऑक्टोबर) होईल.

बदलानंतर भारतीय संघ: रोहित शर्मा (कर्णधार), के.एल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक (विकेटकीपर), आर अश्विन, युझवेंद्र चहल, शाहबाज अहमद, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, मोहम्मद शमी, हर्षल पटेल, दीपक चहर, जसप्रीत बुमराह.