नवी दिल्ली : ‘ताबारेषेवर एप्रिल २०२० ची यथास्थिती चीनने मान्य केलेली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणताही संघर्ष न करता चीनला एक हजार चौरस किलोमीटर भूभाग देऊन टाकला आहे, असा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला. लडाखमधील सैन्य माघारीवरून त्यांनी मोदी सरकारला लक्ष्य केले. दोन वर्षांपूर्वी भारत आणि चीन यांच्यात गलवान खोऱ्यात संघर्ष झडला होता. वाढलेल्या तणावानंतर ताबारेषेवर एप्रिल २०२० ची यथास्थिती पूर्ववत झाल्याखेरीज चीनशी द्विपक्षीय संबंध सुधारणार नाही, असे भारताकडून वारंवार सांगण्यात येत आहे. यापार्श्वभूमीवर पूर्व लडाखमधील गोगरा-हॉटस्प्रिंग भागतील गस्तीबिंदू १५ वरून सैन्य माघार घेण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली. ती पूर्ण झाल्याचे निवेदन भारताकडून जारी करण्यात आले आहे.
जुलैमध्ये दोन्ही देशांच्या कोअर कमांडर पातळीवरील वाटाघाटींमध्ये याबाबत सहमती झाली होती. या माघारीनंतर मधला पट्टा ‘बफर क्षेत्र” म्हणून मानला जाणार असल्याने भारतीय सैन्याने याआधीचा आपला गस्तीचा अधिकार गमावल्याचीही टीका होत आहे. त्यापार्श्वभूमीवर काँग्रेसने या निर्णयावर टीका केली.
‘भारत जोडो‘ यात्रेत असलेल्या राहुल यांनी ट्विटमध्ये केले. त्यांनी म्हटले आहे, की ताबारेषेवर एप्रिल 2020 ची यथास्थिती कायम राखण्याची भारताची मागणी चीनने धुडकावली आहे. कोणताही संघर्ष न करता पंतप्रधानांनी एक हजार चौरस किलोमीटर भूमी चीनला देऊन टाकली आहे.‘ ही भूमी परत कशी मिळेल ? हे भारत सरकार सांगू शकेल? ‘असे सवालही राहुल यांनी उपस्थित केले. काँग्रेसच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांनीही हा निर्णय ही तडजोड असल्याचा प्रहार केला.