मुंबईत गणपती विसर्जनाच्या वेळी शिंदे गट आणि ठाकरे गटामध्ये वाद झाल्याचं दिसून आलं आहे. मुंबईतल्या प्रभादेवी भागात मध्यरात्री दोन्ही गट भिडले. यामध्ये दोन्ही गटात हाणामारी झाली. शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी गोळीबार केल्याचाही आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणात २५ शिवसैनिकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिंदे गटातल्या संतोष तेलवणे यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या हातात तलवार, चॉपर आणि इतर हत्यार होती अशी तक्रार तेलवणेंनी केली आहे. तसंच मारहाणीत आपल्याला दुखापत झाली, गळ्यातली १ लाख ४० हजारांची सोन्याची चेन चोरीला गेल्याचंही त्यांनी तक्रारीत म्हटलं आहे.
दादरचे शिवसेना विभागप्रमुख महेश सावंत यांनी शिंदे गटाचे प्रभादेवीमधले शाखाप्रमुख संतोष तेलवणे यांनी मध्यरात्री मारहाण केली. त्यानंतर दोन्ही गटातले आमदार सदा सरवणकर, सुनील शिंदे घटनास्थळी दाखल झाले. यावेळी सदा सरवणकर यांनी हवेत गोळीबार केल्याचाही आरोप करण्यात आला आहे. यानंतर दोन्ही गटामध्ये तणावाचं वातावरण होतं. त्यामुळे परिसरातली कायदा सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या गोंधळाची माहिती मिळताच पोलीस उप-आयुक्त प्रणव अशोक हे देखील घटनास्थळी दाखल झाले आहेत.