दादरा नगर हवेली येथील खासदार मोहन डेलकर यांच्या आत्महत्येप्रकरणी मुंबई पोलिसांनी दाखल केलेला गुन्हा हायकोर्टाकडून रद्द करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्यासह 9 बड्या सरकारी अधिका-यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. सिव्हासा येथील जिल्हाधिकारी संदिप कुमार सिंह यांनाही याप्रकरणी आरोपी बनवण्यात आलं होतं. मरीन ड्राईव्ह येथील हॉटेल सी ग्रीनमध्ये 22 फेब्रुवारी रोजी पंख्याला लटकून मोहन डेलकर यांनी आत्महत्या केली होती. त्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. हा गुन्हा हायकोर्टाकडून रद्द करण्यात आला आहे.
खासदार मोहन डेलकर यांनी मुंबईतील मरीन ड्राईव्ह येथील हॉटेल सी ग्रीनमध्ये 22 फेब्रुवारी रोजी पंख्याला लटकून आत्महत्या केली होती. डेलकर यांनी आत्महत्या केल्याने अनेकांना धक्का बसला होता. दादरा-नगर हवेलीच्या खासदारानं मुंबईत आत्महत्या का केली?, असा प्रश्न उपस्थित झाला. तसेच गुजराती भाषेत लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये राजकीय नेते, प्रशासकीय अधिकारी आणि काही पोलीस अधिकाऱ्यांकडून सातत्याने मानसिक छळ होत असल्याचं लिहिलं होतं. याप्रकरणी काही व्यक्तींची नावंही त्या चिठ्ठीत लिहीली होती.
कोण होते महन डेलकर? –
58 वर्षीय मोहन डेलकर हे साल 1989 पासून दादरा आणि नगर हवेली लोकसभा मतदारसंघातून खासदार होते. ते दादरा आणि नगर हवेली येथून तब्बल 7 वेळा खासदार म्हणून निवडून आले होते. साल 2009 मध्ये ते काँग्रेस पक्षात दाखल झाले. परंतु 2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिली आणि अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात उतरत मोठ्या मतांनी पुन्हा विजयी झाले होते.