पुणे : राज्यातील ३१ डिसेंबर २०२२ अखेर निवडणुकीस पात्र असलेल्या २८१ कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. याबाबत राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाकडून ७ सप्टेंबरपासून प्रक्रिया सुरू करण्यात येत असल्याची माहिती प्राधिकरणाचे आयुक्त डॉ. जगदीश पाटील यांनी दिली.बाजार समित्यांसाठी मतदान येत्या २९ जानेवारी रोजी तर, मतमोजणी ३० जानेवारीला होणार आहे.
उच्च न्यायालयाने विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांची निवडणूक पूर्ण करुन बाजार समितींच्या निवडणूका पूर्ण करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार कार्यवाही पूर्ण करून प्राधिकरणाने आज निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. बाजार समितीच्या निवडणुकीसाठी बाजार क्षेत्रातील कार्यरत प्राथमिक कृषी पत संस्था, बहुउद्देशीय सहकारी संस्था व ग्रामपंचायत यांचे सदस्य मतदार आहेत. या सदस्यांची यादी २७ सप्टेंबरपर्यंत जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्याकडे सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. याशिवाय बाजार क्षेत्रातील परवानाधारक व्यापारी, अडते व हमाल, तोलाईदार हे बाजार समितीचे मतदार आहेत. या मतदारांची यादी १ नोव्हेंबर २०२२ पर्यंत जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्याकडे सादर करण्याचे निर्देश संबंधित बाजार समित्यांना दिले आहेत.
सहा बाजार समित्यांसाठी मतदान १८ डिसेंबरला
कृषी उत्पन्न बाजार समित्यांची निवडणूक घेण्यासंदर्भात उच्च न्यायालयात याचिका दाखल झाल्या आहेत. त्यावर उच्च न्यायालयाने श्रीरामपूर, राहता, जाफराबाद, भोकरदन, वसमत आणि धारुर या सहा बाजार समित्यांची निवडणूक प्रक्रिया कालावधीत पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार प्राधिकरणाने या बाजार समित्यांच्या निवडणुका २ सप्टेंबर २०२२ रोजीच्या आदेशानुसार सुरु केल्या आहेत. या बाजार समित्यांचे मतदान व मतमोजणी अनुक्रमे १८ डिसेंबर व १९ डिसेंबर रोजी होणार असल्याची माहिती डॉ. पाटील यांनी दिली.
निवडणूक कार्यक्रम
प्रारूप मतदार यादी प्रसिद्धी १४ नोव्हेंबर
अंतिम मतदार यादी ७ डिसेंबर
नामनिर्देशनपत्र कालावधी- २३ ते २९ डिसेंबर
छाननी – ३० डिसेंबर
उमेदवारी मागे घेण्याचा कालावधी – २ ते १६ जानेवारी २०२३
उमेदवारांची अंतिम यादी आणि चिन्ह वाटप – १७ जानेवारी
मतदान २९ जानेवारी
मतमोजणी ३० जानेवारी